Ganeshotsav 2024 : अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या श्री गणेशमूर्ती !

316
अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या श्री गणेशमूर्ती !
अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या श्री गणेशमूर्ती !
मकरंद करंदीकर

‘कलौ चंडी विनायकौ’ या उक्तीनुसार या कलियुगात आदिशक्ती आणि विनायकाची भक्ती शीघ्र फलदायी ठरते. साहजिकच जगभरामध्ये हिंदू धर्मीय, सर्वात मोठ्या प्रमाणावर गणेशाची आणि देवीची भक्ती करतात. हजारो वर्षांपूर्वी गणपती हा अगदी जगभरात अफगाणिस्तान, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन, जपान, तुर्कस्तान, व्हिएतनाम, इंडोचायना, कंबोडिया, हॅनोई, जावा, सुमात्रा, बाली, थायलंड ( सयाम ), बोर्निओ, लाओस, मेक्सिको, इराण, रोम, फ्रान्स अशा असंख्य देश प्रदेशात पोचला. हजारो वर्षात या गणेशाने त्या त्या देशातील स्थानिक रूपे, शस्त्रे, पोशाख धारण केले. कुठे दाढीधारी, तर कुठे हातामध्ये मुळा घेतलेला गणेश ! (हा तुटलेला दात असावा. या मागच्या कथेचा संदर्भच न कळल्यामुळे पांढरा दात हा मुळा वाटला असावा. अगदी मुंबईतील एका सुप्रसिद्ध गणेश मंदिरातील मूर्तीच्या हातातील परशु हा अनेक वर्षे रंगविताना त्याचा, हाताने वारा घेण्याचा पंखा होऊन बसला आहे.) (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे नोकरदार खोळंबले)

महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा विशेष मानला जातो. देश-विदेशात त्याबद्दल खूप कुतूहल असते. आता जगभरात प्रत्येक राष्ट्रात पोचलेल्या मराठी मंडळींनी, आपल्या सोबत हा गणपती बाप्पाही तेथे नेला आहे. हजारो वर्षे, हजारो आख्यायिका आणि कथा, जगाच्या इतक्या मोठ्या भागात, इतक्या प्रचंड प्रसारामुळे गणपतीच्या रूपामध्ये खूप वैविध्यता पाहायला मिळते. स्त्री रूपामध्ये (वैनायकी), स्त्री पुरुष रूपामध्ये एकत्र (कांगितेन – जपान), द्विमुखी- त्रिमुखी – पंचमुखी, दोन हातांपासून सोळा – अठरा हातांचा अशा विविध रूपामध्ये गणपतीच्या प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे हत्तीचेच आहे. आपणही आजवर हजारो मूर्ती पाहत आलो आहोत.

माझ्या संग्रहातील कांही वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा वेगळ्या मूर्तींचे दर्शन आणि माहिती घेऊया….

१) कांगितेन (शोतेन)

New Project 19

यामध्ये जपानी गणेश व गणेशी एकमेकांना आलिंगन देतांना पाहायला मिळतात. भारतीय योगशास्त्रावर आधारित, गुप्त तांत्रिक मार्गाने साधना करणारा एक पंथ जपानमध्ये अस्तित्वात आहे. या परंपरेतील या कांगितेन जोडीमधील पुरुष रूपातील गणेशाच्या डोक्यावर चिंतामणी असतो. आपल्याकडेही जुन्या चित्रात, लेण्यांमध्ये विनायकाप्रमाणे स्वतंत्र स्त्री रूपात विनायकी, वैनायकी पाहायला मिळते.

२) रिद्धी विनायक व सिद्धी विनायक

New Project 17

या मूर्तीमध्ये गणेशाचा एक देह, चार हात आणि उजवीकडे आणि डावीकडे सोंड असलेली दोन मस्तके आहेत. हा गणपती उच्चासनावर विराजमान असून त्याने उजवा पाय खाली सोडलेला आहे. या मूर्तीवर अनेक अलंकार पाहायला मिळतात.

३) एकाच मूर्तीत रिद्धी व सिद्धी विनायक

New Project 18

यात मूर्तीच्या एका बाजूला उजव्या सोंडेचा तर दुसऱ्या बाजूला डाव्या सोंडेचा गणपती आपल्याला दर्शन देतो. हे दोन्ही गणपती पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. या ब्रॉन्झच्या मूर्तीतील मुकुट, मेखला, सोंड यांच्यावर चांदी व तांब्याचे कोरीव काम आढळते.

४) मानवी कवट्यांवर विराजमान, कापालिक गणेश

New Project 16

माझ्या दिव्यांच्या संग्रहामध्ये हा एक आश्चर्यकारक दुर्मिळ दिवा आहे. यातील गणेशाच्या चार हातांमध्ये अनुक्रमे तुटलेला अर्धा दात, शंख, पोथी आणि मोदक अशा वस्तू आहेत. त्याने नाग यज्ञोपवीत धारण केले असून संपूर्ण वस्त्रावर वेलबुट्टी कोरलेली आहे. डोक्यावरील मुकुट हा खास उंच निमुळता आहे. १२ मानवी कवट्यांच्या आसनावर हा गणेश बसलेला असून प्रत्येक कवटीसमोर एक दिवा आहे. हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराच्या भक्तांमध्ये, महाभारतानुसार शैव, पाशुपत, कालदमन आणि कापालिक असे चार पंथ आहेत. यातील कापालिक पंथीय हे मानवी कवट्यांचा वापर करतात. यातील कित्येक अनुयायी नेपाळ, तिबेटमध्ये आणि पूर्वेकडे थायलंड, जावा, सुमात्रा, बोर्निओ, बाली या देशांमध्ये आहेत. जेथून संकटे येण्याची शक्यता अधिक तेथे या संकटहर्त्या गणेशाची स्थापना केली जाते. हा तेथे अशुभ गणनिवारक म्हणून पुजला जातो.

५) रिद्धी व सिद्धी विनायकाच्या सोंडेत दिवा

New Project 15

भिंतीवर अडकवायच्या या आगळ्यावेगळ्या दिव्यात, आपल्या डाव्या बाजूला डाव्या सोंडेचा व आपल्या उजव्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती आहे. या दोन्ही मुखांच्या सोंडांमध्ये एक कोरीव कलात्मक दिवा आहे. या दिव्याखाली एक छोटीसी घंटा आहे.

६) दशभुजा लक्ष्मी गणेश

New Project 14वीर योध्दे, सेनापती यांनी दशभुजा शस्त्रधारी गणेशाची आराधना केली तर त्यांना दाही दिशांनी यशप्राप्ती होते. तो लक्ष्मी सहित असेल त्यामुळे आपल्या संपत्तीचे रक्षण होते, अशी एक श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दशभुजा शस्त्रधारी गणेशाची मंदिरे आढळतात. माझ्याकडे या प्रकारातील मूर्ती आहे. उच्चासनावर बसलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान असून उजव्या पायाखाली त्याचे वाहन मूषक आहे. कपाळावर छोटा लाल खडा आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक २१ मुखे आणि ४२ हात असलेल्या गणपतीची मूर्ती गाणगापूर येथील श्री दंडवते महाराजांच्या मठामध्ये स्थापित केलेली आहे.

गणेशोत्सव आता अगदी जवळ येऊन ठेपलाय. सर्वांना या महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! (Ganeshotsav 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.