मुंबई पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांना सावली देणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातील सुमारे १०० वर्षे जुन्या वृक्षाने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचाऱ्यांनी या वृक्षाचे उरलेले शेवटचे अवशेष (खोड) गुरुवारी दुपारी उचलून नेले. अनेक वर्षे पोलिसांना सावली देणारे हे वृक्ष यापुढे मुंबई पोलीस मुख्यालयात दिसणार नसल्याची खंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. या वृक्षाची एक आठवण म्हणजे पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो अधिकाऱ्यांनी याच वृक्षाच्या सावलीखाली थांबून पोस्टिंगची वाट बघितली असल्यामुळे मुंबई पोलीस दलात या वृक्षाचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले होते.
( हेही वाचा : महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार – फडणवीस)
दुसऱ्या जिल्ह्यातून मुंबईत बदलून येणाऱ्या अधिकाऱ्याला प्रथम मुंबई पोलीस मुख्यालयात हजेरी लावावी लागे, त्यानंतर त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग पोलीस आयुक्त यांच्याकडून निश्चित होत असे. पोलीस आयुक्तांकडून पोस्टिंगच्या फाईलवर स्वाक्षरी करून येईपर्यत या अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत पोलीस मुख्यालयात थांबावे लागत होते. कुठल्याही क्षणी आयुक्तांकडून बोलवणे येण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस अधिकारी आयुक्त दगडी इमारतीत समोर असलेल्या वृक्षाखाली थांबून पोस्टिंगची वाट पहायचे. १००वर्ष जुने असलेले या वृक्षाभोवती बांधलेल्या कट्ट्यावर वृक्षाच्या सावलीत अधिकारी तासनतास बसून राहत. पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्याला कोणी विचारले “साहेब सध्या कुठे आहेत, तर साहेबांचे एकच उत्तर असे “सध्या झाडाखाली आहे, हे उत्तर एकूण समोरची व्यक्ती समजून जायची की साहेबांची अजून पोस्टिंग झालेली नाही.
हजारो पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत या वृक्षाच्या छायेत अनेक दिवस , आठवडे काढले असल्याचे अधिकारी सांगतात, या वृक्षाखाली अनेकांच्या भेटी होत होत्या, मुंबईत पोस्टिंगवर असलेले अधिकारी पोलीस आयुक्तलयात आल्यावर त्यांची भेट देखील या वृक्षखाली होत असे व गप्पांचे फड देखील वृक्षखाली रंगत असे सेवानिवृत्त अधिकारी संजय निकुंभे यांनी म्हटले आहे. ” मी या वृक्षखाली तब्बल अडीच महिने काढले, अडीज महिन्यांनी मला पोस्टिंग मिळाली असे एका अधिकारी याने सांगितले, हा वृक्ष म्हणजे नवीन येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासाठी एक प्रकारचा आधार होता, जुन्या अधिकाऱ्यांची भेट या वृक्षाखाली होऊन जुन्या आठवणीला उजाळा मिळत असे असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील एक वर्षांपासून या वृक्षाची पाने गळू लागली होती, व त्यांच्या फांद्या सुकून खाली पडत होत्या, वृक्ष अखेरचा घटका मोजत होते, अनेकांनी या वृक्षाची साथ सोडली होती. मरणावस्थेत आलेले हे वृक्ष कोसळून कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून महानगर पालिकेच्या मदतीने हे वृक्ष काढण्याचा निर्णय घेऊन गुरुवारी या वृक्षाचे खोड करवतीने कापून खोडासह ते बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयातील एका अधिकाऱ्याने दिली.
Join Our WhatsApp Community