गावस्करांचे शतक होऊ नये म्हणून पाकिस्तान मैदान सोडून चालला होता, तेव्हा अंपायर गोठोस्करांनी भरला दम आणि…

166

क्रिकेट म्हटलं की खेळण्यासाठी जसे दोन संघ आवश्यक असतात, तसेच सर्वात महत्वाचे असतात ते म्हणजे अंपायर. जशी भटजींशिवाय कुठलीही पूजा संपन्न होऊ शकत नाही, तसाच अंपायरशिवाय कुठल्याही खेळाचा कुठलाही सामना पूर्ण होऊ शत नाही. त्यामुळे अंपायरना खेळात फार महत्वाचं स्थान आहे.

आता क्रिकेट हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. भारतीय क्रिकेट संघातून अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले ज्यांनी काळ गाजवला. पण असेही एक भारतीय अंपायर आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काळच नाही तर एक युग गाजवलं आहे. त्यांचं नाव आहे माधव गोठोस्कर. 30 ऑक्टोबर 1928 रोजी जन्म झालेल्या गोठोस्करांना 30 ऑक्टोबर रोजी 94 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच निमित्ताने हिंदुस्थान पोस्टने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंपायरिंगच्या वेळी आलेला एक अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे.

cricket 5
सचिन तेंडुलकर सोबत माधव गोठोस्कर

(हेही वाचाः का चुकतात हल्लीच्या अंपायर्सचे निर्णय? माधव गोठोस्करांनी सांगितली कारणे)

गावस्करचे शतक होऊ नये म्हणून पाकचे प्रयत्न

1983 साली भारत विरुद्ध पाकिस्तान असा काटे की टक्कर कसोटी सामना बंगळूर येथे खेळवला जात होता. त्या सामन्यात मी अंपायरिंग करत होतो. त्यावेळी अनिवार्य षटकं 20 होती आणि ती टाकलीच पाहिजेत अशी होती. त्यानुसार सामन्याच्या शेवटच्या दिवशी देखील 20 षटकं अनिवार्य होती. पण भारताचा फलंदाज सुनिल गावस्कर हा 14 षटकं झाल्यानंतर 82 धावांवर खेळत होता. त्यामुळे गावस्करचं शतक होऊ नये म्हणून पाकिस्तानचा कर्णधार जहीर अब्बासने 4.30 वाजले असून सामन्याची वेळ संपल्याचे सांगत संघासह मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदानातील भारतीय प्रेक्षक संतापले आणि त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली.

cricket 2 1
गोठोस्कर सामन्यात अंपायरिंग करतानाचा क्षण

गोठोस्करांनी भरला दम

यामुळे मी पाकिस्तानी संघाला मैदान सोडून जाण्यापासून रोखले. 20 षटकं पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही सामना अर्धवट सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही जर का सामना अर्धवट सोडून गेलात तर मी सामना भारताने जिंकला असे जाहीर करीन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुमची काय नाचक्की होईल हे लक्षात ठेवा. मी असे सांगताच नाईलाजाने पाकिस्तानला तो सामना पूर्ण खेळावा लागला. आणि सुनिल गावस्कर यांनी 20व्या षटकांत दुस-या चेंडूवर चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले.

cricket 4
गोठोस्कर उद्योगपती जे आर डी टाटांना हस्तांदोलन करताना

यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यावेळी गावस्करांसोबतच माधव गोठोस्करांचाही जयजयकार प्रेक्षकांकडून करण्यात आला. कसोटी सामन्यात आलेल्या या कसोटीच्या क्षणी इतक्या शांतपणे योग्य तो निर्णय घेतल्याने गावस्कर यांनी देखील त्यावेळी गोठोस्कर यांचे आभार मानले होते.

cricket 3
माधव गोठोस्कर बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार करताना
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.