कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या पुलावर आनंदनगर सबवे येथे लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे 29 ऑक्टोबर रोजी रात्री 11:00 वाजेपासून दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत आणि दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री 11.00 ते दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत या ठिकाणच्या ठाणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मार्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळवली आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे:
- प्रवेश बंद – नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग – सदरची वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास – शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापे मार्गे रबाळे – ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
- प्रवेश बंद – घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पुर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजीवाडा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग – सदरची वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा ब्रिजवरुन खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक- पारसिक रेती बंदर मुंब्रा बायपास शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापेमार्गे रबाळे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
( हेही वाचा: दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागांची बंपर भरती, ६९ हजारांपर्यंत मिळेल पगार )
हलक्या वाहनांकरता
- प्रवेश बंद – नाशिक व घोडबंदर रोडने तसेच ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तीन हात नाका ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग – नाशिक कडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही साकेत कट डावीकडे वळण घेऊन महालक्ष्मी मंदिर – साकेत रोड-क्रिकनाका-डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज ऐरोली ब्रिजमार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
- पर्यायी मार्ग – ठाणे शहरातून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने हि जी.पी. ऑफिस-ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड-आर. टी.ओ. कार्यालय समोरुन क्रिकनाका कळवा ब्रिज-शिवाजी चौक कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
- पर्यायी मार्ग – घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवून एल. बी. एस. रोडने मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.
- पर्यायी मार्ग – घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने ही तीन होत नाका-तुळजा भवानी मंदिर कट-सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज-कोपरी सर्कल- बाग बंगला-फॉरेस्ट ऑफिस-माँ बाल निकेतन स्कूल- आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईकडे इन्छित स्थळी जातील.
- ही वाहतूक अधिसूचना दि. 29 ऑक्टोबर रोजी रात्रौ 23.00 ते दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.00 वा. पर्यंत आणि दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्रौ 23.00 ते दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 06:00 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड रुग्णवाहिका, ग्रीन कारीडोर, ऑक्सिजन गॅस वाहन व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाना लागू राहणार नाही, असे उप आयुक्त कांबळे यांनी कळविले आहे.