T-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून गुण तालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. भारतीय संघाला विजेतेपद मिळण्याची आशा भारतीय चाहत्यांना आहे. भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरी सलामीवीर के एल राहुलला अजून सूर सापडलेला नाही.
त्यामुळे राहुलला आगामी सामन्यांतून वगळून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
राहुलला वगळणार?
रविवार 30 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. भारत गुण तक्त्यात 4 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिका संघ 3 गुणांसह दुस-या स्थानी आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विक्रम राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही लोकेश राहुलच्या जागी रिषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळवणार नाही. ऋषभ पंत कठोर परिश्रम घेत आहे, तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. पण संघात फक्त 11 खेळाडूंनाच स्थान देण्यात येते, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली आहे.
(हेही वाचाः International Internet Day : एका साध्या मेसेजमधून झाला होता इंटरनेटचा जन्म, काय होता मेसेज?)
तुंबळ युद्ध होणार
टी-20 विश्वचषकातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकही सामना हरलेला नाही. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेला केवळ एक गुण मिळाला. पण बांग्लादेश विरुद्धच्या दुस-या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 104 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे नेट रन रेट हा भारतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात गुण तक्त्यात पहिल्या स्थानासाठी आणि उंपात्य फेरीकडे कूच करण्यासाठी दोन्ही तुल्यबळ संघांत तुंबळ युद्ध रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community