मुख्यमंत्र्यांनी फक्त एक फोन केला आणि तीन मिनिटांत कोट्यवधींचा निधी आला

158

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील अनेक रखडलेले निर्णय मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. नंदुबारमध्ये तर मुख्यमंत्र्यांनी केवळ व्यासपीठावरुन एका फोनवर 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत आपल्या सरकारच्या गतिमानतेची प्रचिती दिली आहे.

केवळ एक फोन फिरवला आणि…

नंदुरबार नगरपालिका नवीन इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या भाषणात या नव्या इमारतीसाठी राज्य शासनाकडून मिळणारा 7 कोटी 28 लाखांचा निधी अजूनही देण्यात आला नसल्याचे सांगितले.

(हेही वाचाः राज्यातील पोलिस भरतीला तात्पुरती स्थगिती, काय आहे कारण?)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरुनच मंत्रालयात शासकीय अधिका-याला थेट फोन केला आणि या रखडलेला निधी देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या फोननंतर अवघ्या तीन मिनिटांनी अधिका-यांनी आदेश काढले आणि नंदुरबार नगरपालिकेच्या नव्या इमारतीला 7 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कार्य तत्परतेने सगळ्यांचीच मने जिंकली आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

हे गतिमान सरकार- मुख्यमंत्री

केवळ तीन मिनिटांत आपण नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा निधी मंजूर केला आहे. हे गतिमान सरकार आहे. या सरकारने राज्याच्या हितासाठी 72 मोठे निर्णय घेतले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतक-यांना मिळावी यासाठी आपण तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरीब गरजूंची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी 7 कोटी लोकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.