मंत्रालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा – नीलम गोऱ्हे

137

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये अवर सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी एका उपसंचालक दर्जाच्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पुढे आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

( हेही वाचा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रचार कमिटीमध्ये होता १९ वर्षीय भारतीय मुलगा; हा प्रज्वल पांडे आहे तरी कोण?)

‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशी मागणी अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने केली. त्यावेळी त्यांच्या केबीनमध्ये या विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडित महिला अधिकाऱ्याने लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला आहे. तसेच त्यांच्या सचिवांना देखील त्याची प्रत पाठवली आहे. मात्र, त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पीडित महिलेने माझ्याकडे धाव घेतली आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

दखल का घेतली नाही?

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी स्वतः चौकशी करून या महिलेला न्याय द्यावा. त्याआधी संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब जबाबदारीतून मुक्त करावे. त्याशिवाय चौकशी नि:पक्षपाती होणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये जर मंत्रालयात होत असतील आणि इतके दिवस उलटूनही त्याची दखल घेतली जात नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये ताबडतोब लक्ष घालावे, अशा प्रकारचे निर्देश देत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.