सदाभाऊ खोत रविवारी घेणार शेतकरी मेळावा

143

शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासह, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत शेतकरी मेळावा घेणार आहेत. रविवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता काळूस (ता. खेड) येथे हा मेळावा हेईल, अशी माहिती पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वस्ताद दौंडकर यांनी दिली.

( हेही वाचा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रचार कमिटीमध्ये होता १९ वर्षीय भारतीय मुलगा; हा प्रज्वल पांडे आहे तरी कोण?)

गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला खेडमधील सेझबाधित शेतकऱ्यांचा १५ टक्के परताव्याचा प्रश्न, काळुस भागातील चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले सात बारावरील शिक्के काढण्याची मागणी, ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्टयातील भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढणे, ३० वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, अशा विविध प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांनी संघटित होऊन शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत प्रमुख मार्गदर्शन करतील. काळूस येथील श्री राम मंदिर सभा मंडपात मेळावा होत आहे. यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, खेड तालुका अध्यक्ष सुभाषराव पवळे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहतील.

आंदोलनाचे धोरण काय?

‘दलालांपासून शेतकऱ्यांना वाचवूया, जमिनी आपल्या सुरक्षित राखूया’, हे या मेळाव्याचे धोरण आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.