राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीच्या महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांची सुरक्षा काढून घेतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र कायम ठेवली आहे. त्यामुळे नार्वेकर हे शिंदे गटातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्याचे स्पष्ट संकेत पुन्हा एकदा मिळाले आहेत.
मात्र,एका बाजूला पक्षातील सर्वांची सुरक्षा व्यवस्था काढून घेत असतानाच नार्वेकर यांची सुरक्षा कायम ठेवल्याने शिवसैनिक नाराज असल्याचेही बोलले जात आहे. नार्वेकर यांना शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचीच अधिक भीती असल्याने ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याचे बोलले जात असल्याने आता सुरक्षा कायम ठेवली, मग शिंदे गटात कधी सामील होणार याचाही मुहूर्त सांगावा अशाप्रकारची प्रतिक्रिया दबक्या आवाजात नाराज शिवसैनिकांकडून ऐकायला मिळत आहे.
नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तुरुंगात असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री भास्कर जाधव,छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र, मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा काढण्याऐवजी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. नार्वेकर यांना आधी एक्स दर्जाची सुरक्षा होती, पण आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षकांसह निवासस्थानी एक गार्ड कमांडर तसेच चार गार्ड तैनात असतात.
(हेही वाचाः भाजपची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी, मनसेची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी?)
नार्वेकरांना दूर लोटले
नार्वेकर यांची खरी ओळख हे उध्दव ठाकरे यांचे स्वीय सचिव म्हणून होती. परंतु त्यांनी ही ओळख पुसण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाच्या सचिवपदी वर्णी लावून घेतली. राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोअर कमिटीमध्ये नार्वेकर यांना घेण्यात तर आले, पण त्यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी देण्यात आली नव्हती. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायक पदाची जबाबदारी एकेकाळी अंगरक्षक असलेल्या रजपूत यांच्यावर सोपवण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेना सोडल्यानंतर कठीण प्रसंगी पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सहायक असलेल्या रवी म्हात्रे यांना उध्दव ठाकरे यांनी जवळ करत नार्वेकर यांना दूर लोटण्यास सुरुवात केली आहे.
नार्वेकर शिंदे गटाचे?
शिंदे गटाला प्रोत्साहन देण्यास नार्वेकर यांची मोलाची भूमिका असल्याची माहिती समोर येऊ लागल्यानंतर आणि त्यांना मिळणारे समर्थन, यामुळे नार्वेकर यांच्याविरोधात एकप्रकारे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे नार्वेकर हे कधी तरी शिंदे गटात सहभागी होतील अशाप्रकारची कुणकूण लागल्याने उध्दव ठाकरे यांनी त्यांना बाजूला केल्याने शिवसैनिकांमधील नाराजी अधिक गडद होत असताना त्यांची वाढवलेली सुरक्षा यामुळे ही नाराजी अधिकच वाढली आहे. नार्वेकर हे शिवसेना उध्दव गटाचे नसून शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाचेच असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
नार्वेकरांभोवती शिंदे-फडणवीसांचे वलय
नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत नार्वेकर हे उमेदवार म्हणून असतानाही उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सदस्य असूनही मतदानासाठी आले नाहीत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार असतानाही उध्दव ठाकरे तिथे फिरकले नाहीत. उलट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्याठिकाणी उपस्थिती लावली. त्यामुळे नार्वेकर यांच्याभोवती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे वलय असल्याचेही पहायला मिळत आहे.
एका मराठी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसैनिकांकडून धोका असल्याने नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, नार्वेकर यांच्या विरोधात शिवसैनिक आधीच नाराज होते, त्यातच ही सुरक्षा अधिक वाढवल्याने ही नाराजी अधिक जास्त वाढल्याचे ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community