भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्यास होणार 200 रुपयांचा दंड, महापालिकेने जारी केले परिपत्रक

159

मोकाट सुटलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताना आढळल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास, कुत्र्यांना खाऊ घालणा-यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक नागपूर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. कुत्र्यांना खाऊ घालणा-या व्यक्तींवर 200 रुपये दंड आकारण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

महापालिकेचे परिपत्रक

शहर किंवा आसपासच्या परिसरातील कोणीही व्यक्ती किंवा रहिवाशाने भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न खाऊ घालू नये. जी व्यक्ती अशा पद्धतीने भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असल्यास त्यांनी अशा कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांना आपल्या घरी आणावे. तशी महापालिकेत रितसर नोंदणी करावी किंवा त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेऊन त्यांचे लाड करावेत. तसेच त्यांचे लसीकरण आणि इतर आरोग्यविषयक बाबींचीही काळजी घ्यावी, असेही या आदेशात नागपूर मनपाने म्हटले आहे.

नागरिकांना आवाहन

सार्वजनिक ठिकाणी कुठलीही व्यक्ती भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना आढळल्यास त्यांचा फोटो क्लिक करुन नागपूर महापालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाठवावा. त्याची दखल घेण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.