मिटक्या मारुन झाल्यानंतर मिटवा मिटवीची भाषा कशाला उद्धवराव!

178

“फडणवीस, कटुता संपवा! लागा कामाला!!” या शीर्षकाचा अग्रलेख २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सामनामध्ये प्रसिद्ध झाला. मला कधीकधी प्रश्न पडतो की सामनाचे अग्रलेख कोण लिहित असेल? कारण उदाहरण, उपमा, तुलना करताना आपण जरा भान ठेवलं पाहिजे. नाहीतर आपला गंभीर लेख विनोदी होऊन जातो, याचं भान सामनाकारांना नाही. अग्रलेखाच्या शेवटी ते लिहितात, “उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. येथे आपण कोण?” या वाक्याचा अर्थ कोणाला कळला असेल तर त्यांनी तो समजावून सांगावा.

एखादा माणूस जन्माला आल्यावर तो जाणारच… सत्ता जाणं आणि माणूस जाणं यात फरक आहे. पण याचं भान अग्रलेख लिहिणार्‍यांना नाही. त्यामुळे उदाहरण देताना आपल्याला नेमकं काय मांडायचं आहे याचा गोंधळ उडतो. असो! आता या सबंध अग्रलेखात गद्दार, चिपळ्या असे ठेवणीतले शब्द आहेच. यात कटुतेच्या राजकारणात आपण कसे नामानिराळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. गंमत म्हणजे नारायण राणे, कंगना राणावत, अनंत करमुसे, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमैया असा अनेक लोकांवर वैयक्तिक सूड उगवणारे ठाकरे सरकार; आता हेच ठाकरे फडणवीसांना ज्ञान देत आहेत की राजकारणात कटुता असू नये. पण ही कटुता आणली कोणी? याचा विसर ठाकरेंना व्यवस्थित पडलेला आहे.

मग यामागे काहीतरी रहस्य असेल. गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात याचिका दाखल केली आहे, संजय राऊत अजूनही आत आहेत, मागे सुशांत सिंह व दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आलं होतं, सचिन वाझे, मनसुख हिरेन किंवा आणखी एखादे प्रकरण यामुळे ठाकरे व्यथित तर झाले नाहीत ना? म्हणजे आता कदाचित ठाकरेंना हे कळून चुकलंय की देवेंद्र फडणवीसांसोबत आपण दगाबाजी करुन खूप मोठी चूक केली आहे. कारण अडीच वर्षांत सत्ता तर गेलीच, त्यात त्यांची संघटना देखील फुटली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना लाभ होण्याऐवजी तोटा अधिक झाला आहे. या गोष्टीची जाणीव पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना झाली असावी म्हणून “झालं गेलं गंगेला मिळालं” असं आवाहन किंवा अशी विनंती ते फडणवीसांना करत आहेत का? समजा, खरंच त्यांना या गोष्टीची जाणीव झाली असली तरी त्यांची भाषा अजूनही बदलली नाही. दुसरी गोष्ट आता खूप उशीर झाला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना टेकओव्हर करण्यात यशस्वी ठरतील किंवा नाही हे काळ सांगेल. परंतु ठाकरेंचं राजकारण मात्र ओव्हर झालं आहे. महानगरपालिकेमध्ये दारुण पराभव झाल्यास ठाकरे सहसा पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. हा प्रयत्न मुंबईतील आपली सत्ता वाचवण्यासाठी चालला आहे. पण यातही आपलं काही चुकलं हा भाव ठाकरेंकडे नाही.

फडणवीसांशी गद्दारी करुन, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेची फळे चाखून व विरोधकांना नाहक त्रास देऊन मिटक्या मारुन झाल्यानंतर आता मिटवामिटवीची भाषा करण्यात कोणतं शहाणपण आहे? खरंतर आता विनंती, निवेदन वगैरे करण्याची वेळ संपली आहे. आता जे होईल ते बघत बसण्यापलीकडे ठाकरेंच्या हातात काहीच उरलेलं नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.