पुणेमधील खेड तालुक्यातील सेझ बाधित शेतकरी तसेच आसखेड व चासकमान प्रकल्पमधील पुनर्वसन बाधित शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काळूस (ता. खेड) येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कागदोपत्री असलेले आभासी लाभ क्षेत्र दाखवून अन्याय
या खेडमधील सेझबाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १४ वर्षे पासून प्रलंबित आहे. काळुस भागातील चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले ७/१२ वरील शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्ट्यातील भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के आजही अनेक वर्ष संघर्ष करूनही काढण्यात आलेले नाहीत. भामा आसखेड प्रकल्पामधील चुकीच्या धोरणामुळे पुनर्वसन क्षेत्राच्या नावाखाली तेथील बाधित शेतकऱ्यांना आजही सिंचनाची कोणतीच सुविधा मिळत नाही. परंतु कागदोपत्री असलेले आभासी लाभ क्षेत्र दाखवून त्याच्यावर अन्याय करण्यात येत आहे.
(हेही वाचा क्रिकेटमध्ये असे काय घडले, पाकिस्तानच म्हणते साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारत जिंकावा!)
रयत क्रांती शेतकरी संघटनेचा मेळावा
३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न अशा प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना संघटित करून शासनापर्यंत निवेदनाद्वारे हे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडणार असून या संदर्भात शासन स्तरावरील व्यापक अशी बैठक लावण्या संदर्भात निवेदन करणार आहोत. तरी देखील शासनाने दखल घेतली नाही तरी आंदोलनाचे शस्त्र उभारून भविष्यात सर्व शेतकरी घेऊन मंत्रालयावर धडक मागणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी तेथे जमलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केले. या मेळाव्यात रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत, रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत काळभोर, शेतकरी संघटना खेड तालुका अध्यक्ष सुभाषराव पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना वस्ताद दौंडकर इत्यादी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community