आठवडाभर फटाक्यांच्या आतषबाजीनंतर आता श्वसन आणि खोकल्याच्या त्रासाने जवळपास सर्वच जण हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जनरल फिजिशियनकडे रुग्णांची रांग वाढली आहे. तुम्ही अॅलोपॅथीची उपचारपद्धती घेत असाल तर गेल्या काही दिवसांत दोन दिवस तुम्हाला सतत गुंगीत राहिल्यासारखे वाटत असेल. खोकला नुकताच सुरु झाला असेल किंवा सतत त्रास होत नसेल, तर घरगुती उपायांनी खोकला तसेच नुकतीच सुरु झालेली सर्दी आटोक्यात येऊ शकते, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. कुश पाचणेकर यांनी दिली.
बाजारात आता सर्दी, खोकल्यांच्या औषधात झोप येणारी औषधे दिली जातात. कित्येकदा या औषधांमध्ये एन्टीबायॉटीक आणि स्टेरॉइड्सचाही समावेश होतो. काही वर्षानंतर स्टेरॉइड्सचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. त्या तुलनेत आता ब-याच जणांनी आयुर्वेदाचे उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु सर्दी-खोकल्याची सुरुवात असेल तर घरगुती उपायही रामबाण उपाय ठरतात, असेही डॉ. पाचणेकर यांनी सांगितले.
(हेही वाचा देशात सामान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)
हे उपाय करा
- सुंठ आणि मधाचे मिश्रण – लहान मुलांपासून ते अगदी प्रौढापर्यंत हा उपाय सर्वांना परिणामकारक दिसून येतो. लहान मुलांना चमचाभर मधात चिमूटभर सुंठ पावडर टाकून त्यांना सेवनासाठी देता येईल. प्रौढांसाठी एक चमचा सुंठ पावडर आणि समप्रमाणात मधाचे सेवन करता येईल.
- नाक चोंदलेले असेल तर गरम पाण्याची वाफ घ्या. पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब टाका.
- छातीत अडकलेला कफ जाण्यासाठी गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल घट्ट पिळून घ्या. या टॉवेलवरची वाफ हळूहळू छातीजवळ न्या. शरीराला चटका बसणार नाही, ही काळजी घेत टॉवेल छातीवर ठेवा. काही मिनिटांनी पुन्हा ही प्रक्रिया करा.