वेदांत फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, त्यामुळे महाराष्ट्र सरकारची नाचक्की होऊ लागली आहे, असे असताना महाराष्ट्रात मोठा प्रकल्प येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ॲमेझॉन समूहातील एका कंपनीचे देशातील सर्वांत मोठे केंद्र ठाण्यात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरता ‘ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस’ या कंपनीने एक हजार ८४० कोटी रुपयांची जागा खरेदी केली आहे, तसेच १३० कोटींचे मुद्रांकशुल्कही भरले असल्याची माहिती मिळत आहे.
६० एकर जागेवर प्रकल्प उभा राहणार
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस यांनी बाळकूम पाडा येथील ६० एकर जागा एक हजार ८४० कोटी रुपये खर्चून विकत घेतली आहे. अनंता लँडमार्क्स या कंपनीकडून ही जागा खरेदी करण्यात आली असून, ही कंपनी कल्पतरू समूहाचा भाग आहे. या जमिनीवर अॅमेझॉनकडून डेटा सेंटर उभे केले जाणार आहे. बाळकूम पाड्याची ही जागा कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो लाइनपासून हाकेच्या अंतरावर आहे. तसेच ही मेट्रो लाइन पुढे गायमुख-घाटकोपर-वडाळा या मेट्रोला जोडली जाते. पुढे तेथूनच मेट्रोद्वारे पवईमार्गे दहिसरपर्यंत जाणे शक्य आहे. यामुळेच ॲमेझॉनने ही मोक्याची जागा हेरली असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडीला संबंधित कंपन्यांकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घोडबंदर रस्त्याला समांतर असलेल्या कोलशेत मार्गावरील जुन्या औद्योगिक जमिनींचे आता मोठ्या टाऊनशिपमध्ये रूपांतरण झाले आहे. यामध्येच बाळकूमचादेखील समावेश होतो. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या टाऊनशिप तेथे आल्या आहेत. अशा सर्व विकासित क्षेत्राने घेरलेल्या भागात ॲमेझॉनने ही मोक्याची जागा शोधली आहे.
(हेही वाचा देशात सामान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)
Join Our WhatsApp Community