ऋषी सुनक हे वीर सावरकरांच्या संकल्पनेतील हिंदू

138

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एक काळ होता जेव्हा ब्रिटनचा सूर्य मावळत नव्हता. इंग्रजांनी अनेक वर्षे आपल्यावर राज्य केले. जाताना देखील ते फाळणी करुन गेले. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेकांना वाटत होतं की आपण कधी प्रगती करु शकणार नाही. परंतु आपल्या भारतातल्या विविध क्षेत्रातील तरुणांनी जगाचा हा समज खोटा करुन दाखवला. आज आपण अनेक राष्ट्रांच्या पुढे आहोत.

हिंदू व हिंदू परंपरा पाळणारी व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान 

आपल्याला आतंकवाद ही समस्या खूप सतावत होती. आपण पंडित नेहरु यांच्या मार्गावरुन चालत होतो, तोपर्यंत काश्मीरमध्ये भयंकर अस्थिरता होती, जिहादींनी हिंदूंचा नरसंहार केला. काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पाकिस्तान नावाचा टुकार देश अतिरेकी कारवाई करुन आपल्या समोर ताठ मानेने वावरत होता. परंतु २०१४ पासून आपण सावरकरवाद अवलंबला आणि काश्मीरची समस्या आपण अर्ध्याहून अधिक सोडवली व पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. सावरकरवाद स्वीकारल्यानंतर हा बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. आता भारतीय वंशाचे हिंदू ऋषी सुनक हे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे सेक्युलर जगतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एक हिंदू व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान झाली ही त्यांची पोटदुखी आहे. दुसरीकडे हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण अर्थात तेच की हिंदू व हिंदू परंपरा पाळणारी व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान झाली. सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार ऋषी सुनक यांची पितृभूमी आणि पूण्यभूमी भारत आहे. परंतु आपण जी वेगळी व्याख्या स्वीकारली आहे त्यानुसार ऋषी सुनक हे भारतीय नसून केवळ भारतीय वंशाचे किंवा हिंदू आहेत. ते भारताचे नागरिक नाहीत म्हणून ते भारतीय नाहीत.

(हेही वाचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

ऋषी सुनक यांना आता सावध राहावे लागणार

आता सावरकरांचे सबंध चरित्र अभ्यासले तर ऋषी सुनक यांच्याकडून सावरकरांच्या काय अपेक्षा असू शकतात? ऋषी सुनक यांनी ब्रिटनशी निष्ठा बाळगली पाहिजे. खरे पाहता आता ब्रिटनमध्ये सुनक यांची निष्ठा तपासली जाणार आहे. त्यांची भारताविषयीची मते विशेषतः पाहिली जाणार आहेत. त्यामुळे ऋषी सुनक यांना आता सावध राहावे लागणार आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की आपण जरी त्यांना हिंदू मानत असलो, भारतीय वंशाचे मानत असलो तरी त्यांचे विचार नेमके कसे आहेत हे अजून लोकांना माहीत नाही. भारताच्या दृष्टीकोनातून अथवा सावरकरांच्या दृष्टीकोनातून आपल्याला ऋषी सुनक यांच्याकडे पहावे लागणार आहे. अर्थात ऋषी सुनक यांनी ब्रिटनशी निष्ठा बाळगली पाहिजे. परंतु भविष्यात ब्रिटन व भारताचे संबंध पुष्ट झाले पाहिजेत. विशेषतः आतंकवादाच्या विरोधात ब्रिटन आणि भारताने मिळून काम केले पाहिजे. कारण ती समस्या आता त्यांच्याकडे देखील डोके वर काढत आहे. सेक्युलर होण्याच्या नादात अनेकांनी आतंकवादाला आमंत्रण दिले आहे. ऋषी सुनक हे हिंदू असले तरी भारतासाठी ते किती लाभदायक आहेत, हे देखील पहावे लागणार आहे.

इंग्रजांनी जी चुकी केली ती चूक ऋषी सुनक सुधारू शकतात

इंग्रज ज्यावेळी भारतातून गेले त्यावेळी त्यांनी पाकिस्तान नावाचा हिंदूंचा कट्टर वैरी आणि जगाला डोकेदुखी होईल असा देश म्हणा किंवा आतंकवादाचे केंद्र निर्माण केले. महात्मा गांधींना देश स्वतंत्र करण्यापेक्षा हिंदू-मुस्लिम ऐक्य यामध्ये अधिक रस होता. परंतु महात्माजींचा सपशेल पराभव झाला आणि पाकिस्तान नावाचा देश निर्माण झाला. हा देश स्वतंत्र झाल्यापासून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष न देता भारताच्या बरबादीकडे लक्ष देतोय त्यामुळे या देशाची वाताहत झाली. सांगायचे तात्पर्य असे की महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्नाह आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेला पाकिस्तान नावाचा देश हा देश म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही. दुर्दैवाने महात्माजींचे जितके प्रयोग फसले त्यातला पाकिस्तान नावाचा प्रयोग देखील फसला आणि तो हिंदूंसाठीच नव्हे तर जगासाठी डोकेदुखी ठरला. आता एक हिंदू ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यामुळे ऋषी सुनक यांना ह्या गोष्टीची जाणीव करुन द्यायला हवी. विदेश-नितिवर लिहिणाऱ्या विश्लेषकांनी यावर अविरतपणे लिहिले पाहिजे. त्यांचे लेख ब्रिटनमध्ये प्रकाशित झाले पाहिजेत आणि ऋषी सुनक यांनी ते वाचले पाहिजेत. भारतातून जाताना इंग्रजांनी जी चुकी केली ती चूक आता ऋषी सुनक सुधारू शकतात. त्यांना एक चांगली संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी सावरकरांचा राष्ट्रवाद अभ्यासला पाहिजे. ब्रिटनशी निष्ठा बाळगून भारताच्या आणि इतर देशांच्या मदतीने ही समस्या त्यांना सोडवता येईल. ऋषी सुनक पंतप्रधान होण्याने भारताला काय फायदा होऊ शकतो? या दृष्टीकोनातून आपण याकडे पाहिले पाहिजे. तिकडच्या हिंदूंना काय फायदा होऊ शकतो? त्यांच्या सुरक्षिततेत वाढ कशी होईल आणि एकंदर जगाचे कल्याण कसे होईल हे आपल्याला पाहावे लागणार आहे. कारण आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो, जगाच्या कल्याणाचे पसायदान मागतो. सावरकरांच्या हिंदुत्वाची व्याख्या यापेक्षा वेगळी नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.