सध्याचे युग हे डिजिटल युग असल्याने सर्व व्यवहार किंवा पैशांची देवाण-घेवाण ही ऑनलाईन पद्धतीने होताना दिसते. डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यामध्ये सायबर क्राईमही वाढल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन व्यवहार करताना एक साधीशी चूक देखील तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतं. अशातच ऑनलाईन वीज बिल भरताना देखील सावध राहणं आवश्यक आहे. त्यामुळे वीज बिल भरताना काही साध्या गोष्टींचे पालन न केल्यास तुमचे बँक अकाऊंट खाली होऊ शकतं, असा इशाराही देण्यात आला आहे.
(हेही वाचा – वर्षानुवर्षे चलनी नोटांवर दिसणारा गांधींचा ‘हा’ फोटो नेमका आला तरी कुठून?)
सायबर गुन्हे घडवून आणणाऱ्यांनी सामान्यांना फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधून काढले आहे. जे वीज बिलाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार ग्राहकांना वीज बिल जारी केल्यानंतर मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे रक्कम आणि पेमेंटची शेवटची तारीख कळवते. वीज बिलाच्या नावाखाली नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार असेच मेसेज पाठवून लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात. याबाबत भारतीय स्टेट बँकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तुम्ही देखील ऑनलाईन वीज बिल भरत असाल तर कोणती काळजी घ्याल
- जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्या मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे, याची तपासणी करा.
- जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.
- अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका.
- तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते.