राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात विनयभंगासारखा प्रकार घडला आहे. मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील महिला अधिका-याच्या विनयभंगप्रकरणी दोन अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.
कारवाईचे आदेश
मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला कंटाळा आला असून तुम्ही आम्हाला गाणं गाऊन दाखवा, अशी मागणी पीडित महिलेकडे केली होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानंतर या दोन्ही अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
(हेही वाचाः ‘….म्हणून मला वाईट वाटतं, पंतप्रधानांनी विचार करायला हवा’, प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन राज ठाकरेंचे विधान)
चौकशी लवकरच पूर्ण होणार
पीडित महिला अधिकारी ही उपसंचालक या पदावर कार्यरत आहे. 18 ऑक्टोबर रोजी या महिलेचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर महिलेने संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तातडीने लेखी तक्रार केली. मात्र मंत्र्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आपण याबाबत सरकारडे कारवाईची मागणी केल्याचे निलम गो-हे यांनी म्हटले आहे. तसेच अधिका-यांच्या निलंबनाची अधिसूचना सरकारने लवकरात लवकर काढावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी दोन-तीन दिवसांत चौकशी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील स्वागत केले आहे.
Join Our WhatsApp Community