गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली. यासह विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर मुंबईतील दीपोत्सव या दिवाळीतील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी निमंत्रित केले होते. त्यामुळे मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या भेटीगाठी आणि जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यांची महायुती होणार असल्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहे.. यावरच राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
सोमवारी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, दीपोत्सवाचे उद्घाटन होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं यामध्ये काय गैर आहे. जर मी एखाद्या फिल्म स्टारला बोलावलं असतं तर मी चित्रपट व्यवसायात जाणार असे म्हटले असते. अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी महायुतीबाबतची सुरू असलेल्या चर्चेतील हवाच काढून टाकली.
(हेही वाचा – ‘मविआ’ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, ‘शिंदे गटा’च्या 10 खासदार, 41 आमदारांना Y+ सुरक्षा)
यावेळी त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यानंतर २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार आणि कोकणात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे मेळावे सुरू झाल्यास तुम्हाला भरपूर खाद्य मिळेल असाही टोला लगावला. त्यामुळे आता या मेळाव्यांत राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community