गुजरातमधील झुलता पूल पडण्यामागे काय होते कारण?

206
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून तब्बल १४० जणांचा मृत्यू झाला आहे. हा पूल कोसळण्याच्या आधीचे व्हिडीओ आता सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. यामध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये पुलावर क्षमतेपेक्षा कित्येक पटीने पर्यटकांनी गर्दी केली होती, तसेच त्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांमुळे पूल कोसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

पुलाच्या केबलवर तरुणांनी लाथा मारल्या 

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरण्या योग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते. हा झुलता पूल १०० वर्षे जुना होता. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान या पुलावर जमलेल्या पर्यटकांपैकी काही हुल्लडबाज तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. तर काही तरुण चक्क पूल ज्या केबलच्या आधारे जोडण्यात आले आहेत, त्या केबलवरचा लाथा मारताना दिसत होते. या तरुणांच्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करत आहेत.

मुद्दाम पूल हलवण्यात येत होता 

व्हिडिओमध्ये पुलावर तरुणांची गर्दी असल्याचे दिसत आहे. यावेळी काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचेही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात. अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचे त्यांना दिसून आले. तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणेदेखील अवघड झाले होते. विशेष म्हणजे या पुलावर एका वेळी २०-२५ जण जाणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात ४००-५०० जण या पुलावर होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.