गुजरातमधील मोरबी येथे झुलता पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अद्याप ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी करत आहेत. गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी १४० वर पोहोचली आहे.
गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बचावकार्य सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी मोरबीमध्ये रात्रभर मुक्काम करून अनेक एजन्सीद्वारे सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवले. मोरबी दुर्घटनेबाबत कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत या पुलाच्या देखभाल एजन्सीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरबी दुर्घटनेसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीनेही अपघाताचा तपास सुरू केला आहे.
(हेही वाचा गुजरातमधील झुलता पूल पडण्यामागे काय होते कारण?)
पुलाच्या देखभाल करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल
आता या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यात पुलाचे व्यवस्थापक आणि देखभाल पर्यवेक्षकाचा समावेश आहे. याशिवाय पुलाच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व लोकांचीही चौकशी केली जात आहे. हा पूल वापरण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. याशिवाय परवानगी न घेता हा पुल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली आहे.
Join Our WhatsApp Community