मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या दोन वर्षांतील कारभाराची ‘कॅग’मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. पालिकेने कोविड सेंटर उभारण्यासाठी ज्या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट दिले, ती कंपनी त्यावेळेस अस्तित्त्वातच नव्हती, अशीही माहिती आता समोर आली आहे.
( हेही वाचा : मंगळवारपासून पुढील दहा दिवस मुंबईसह ठाणे, भिवंडीत दहा टक्के पाणीकपात )
कोरोना काळात मुंबई पालिकेने केलेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. त्याआधी राज्य शासनाने कॅगकडे काही महत्त्वाची माहिती सादर केली आहे. त्यानुसार, कोरोनाकाळात आरोग्य सुरक्षा पुरवण्यासाठी महापालिकेने काढलेल्या कंत्राटांत पारदर्शकता दिसत नाही. म्हणजे, लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला ५ कोविड सेंटरचे कंत्राट (१०० कोटी रुपये) २६ जून २०२० रोजी देण्यात आले. मात्र, या तारखेआधीपर्यंत ही कंपनी अस्तित्त्वातच नव्हती. त्यामुळे एका अनोंदणीकृत संस्थेला हे कंत्राट दिल्याचे उघड होत आहे.
कोरोनाकाळातील आरोग्य आणीबाणीत औषध खरेदी करतानाही गैरव्यवहार झाल्याकडे राज्य सरकारने कॅगचे लक्ष वेधले आहे. ७ एप्रिल २०२० रोजी मुंबई पालिकेने १ हजार ५६८ रुपये दराने रेमडेसिवीरच्या २ लाख कुप्या खरेदी केल्या. त्याच दिवशी हाफकिन या संस्थेने ६६८ रुपये दराने रेमडेसिवीर खरेदी केले. विशेष म्हणजे मिरा-भाईंदर पालिकेनेही याच दिवशी ६६८ रुपये दराने रेमडेसिवीर कुप्या विकत घेतल्या होत्या. त्यामुळे पुरवठादारांशी संगनमत करून भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
मविआतील बड्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश
- कोविड सेंटरकरिता विविध साहित्य खरेदीसाठी विभाग स्तरावरील सहाय्यक आयुक्तांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते. या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. कोविड सेंटरच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाचेही विशेष ऑडिट करण्याची गरज असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.
- जून २०२१ मध्ये महापालिकेने सर्व रुग्णालयांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १० जून रोजी त्याचे कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.
- मात्र, ही काळ्या यादीतील कंपनी असून, ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन प्लांट पुरवठा खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे यात महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
- त्याचप्रमाणे कोविड चाचण्या करण्याचे कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आले, त्यातील बहुतांश कंपन्या नव्या किंवा अननुभवी होत्या, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.