मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानकादरम्यान असलेल्या १२ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर शेवटच्या सेगमेंटची उभारणी करण्यात आली. त्यामुळे हा १२ किलोमीटरचा मार्ग पूर्ण तयार झाला असून, लवकरच येथून मेट्रोची चाचणी होणार आहे.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेचे काम सुरू आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा १२ किलोमीटरचा मार्ग उन्नत आहे, तर उर्वरित मार्ग भूमिगत आहे. हा मार्ग तयार झाल्याने फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकादरम्यान लवकरच मेट्रोची चाचणी घेतली जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानकादरम्यान १२ किलोमीटरच्या अंतरासाठी तीन हजार ९३४ सेगमेंटचा वापर झाला, तर ४५१ स्पॅनचा वापर झाला. या मार्गावर सात ऑक्टोबर २०१७ रोजी पहिला खांब उभारण्यात आला. तसेच, नाशिक फाटा येथे भव्य कास्टिंग यार्डची उभारणी करण्यात आली. येथेच सेगमेंटची निर्मिती केली. पहिला सेगमेंट २९ ऑगस्ट २०१७ रोजी बनवण्यात आला, तर शेवटचा १९ ऑक्टोबर २०२२ रोजी बनवण्यात आला.
( हेही वाचा: पुण्यातील कोंढवा भागात हॉटेलला भीषण आग )
Join Our WhatsApp Community