पोलिसांच्या खुर्चीत बसून व्हिडिओ बनवणारा दादूस आता बसला कोठडीत!

167

पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करणे ठाकुर्ली चोळेगावच्या दादूसला चांगलेच भारी पडले आहे. मानपाडा पोलिसांनी सुरेंद्र पाटील उर्फ दादूस याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात केले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांना हवे मालकी हक्काचे घर )

कल्याण ठाकुर्ली येथील चोळेगाव या ठिकाणी राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ दादूस याची काही महिन्यांपूर्वी फसवणूक झाली होती. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून पाटील उर्फ दादूस याच्याजवळून लाखो रुपये उकळण्यात आले होते. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुरेंद्र पाटीलने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

त्यानंतर सुरेंद्र उर्फ दादूस याचे मानपाडा पोलीस ठाण्यात वरचेवर येणे जाणे वाढले होते, येथील पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याची चांगली ओळख झाल्याचा फायदा घेत दादूसने थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन त्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःचा व्हिडीओ शूट करून घेतला होता. या व्हिडीओ शूटची कल्पना कदाचित संबंधित अधिकारी यांना असावी, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले असावे. मात्र दादूसने तो व्हिडीओ थेट इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हायरल केला, त्याचबरोबर हातात पिस्तुल घेऊन दुसरा एक व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे दादूस चांगलाच अडचणीत सापडला, अनेकांनी या दादूसचे पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीतील व्हिडीओ, पिस्तुल घेऊन नाचतानाचा व्हिडीओ ट्विटरवर टाकून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना टॅग केले. या ट्विटची दखल घेत मानपाडा पोलिसांनी प्रथम सुरेंद्र पाटील उर्फ दादूसला मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या मर्सडीज या महागड्या मोटारीसह ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या मोटारीत घातक हत्यारे सापडली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून व्हिडीओ काढणे, पिस्तुल हातात घेऊन व्हिडीओ काढून तो समाजमाध्यमावर व्हायरल करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

सुरेंद्र पाटील या बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून त्याच्या जवळील परवाना असलेले पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक मर्सडीज मोटार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली, सुरेंद्र पाटील याला अटक करण्यात आलेली असून त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा यासाठी पत्र व्यवहार करण्यात आलेला असल्याचे गुंजाळ यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.