सध्याचे युग हे डिजिटल युग झाले आहे. त्यामुळे प्रत्येक लहान-मोठे व्यवहार करताना आपण ते ऑनलाईन पद्धतीने करतो. कालांतराने तंत्रज्ञानही खूप विकसित झाले आहे. एक काळ असा होता की लहानशा कामांसाठी लोकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, पण आज तसे राहिले नाही. कारण आता फोनच्या एका क्लिकवर सर्व काम होऊ लागली आहेत. आता तुम्ही व्हॉट्सअॅपचंच बघा. चॅट, कॉल आणि मनी ट्रान्सफर सारखे अनेक फीचर्स दिल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही व्हॉट्सअॅपवरून मेट्रोची तिकिटेही खरेदी करू शकणार आहात.
(हेही वाचा – … तर LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)
व्हॉट्सअॅप आणि बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनने भागीदारीत नवीन फीचर लाँच केले आहे. यानुसार, चॅटबॉटवर आधारित QR तिकीट सेवा प्रदान केली जाणार आहे. त्यामुळे लोकं व्हॉट्सअॅपच्या मदतीने तिकीट खरेदी करू शकणार आहे. ही सुविधा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवरून चालवली जाणार असून प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी चॅटबॉक्स सुविधा मात्र इंग्रजी आणि कन्नड भाषेत उपलब्ध असणार आहे.
तिकिटासह कार्डही करता येणार रिचार्ज
मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीटासोबतच मेट्रो कार्डचाही वापर केला जातो. अशा परिस्थितीत या सुविधेच्या मदतीने केवळ तिकीटच नाही तर स्मार्ट कार्डही रिचार्ज करता येणार आहे.
असा घ्या सुविधेचा लाभ
व्हॉट्सअॅपवर तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना BMRCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक 81055 56677 वर ‘HI’ पाठवल्यानंतर प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होतील. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या प्रवासानुसार हे पर्याय निवडावे लागतील. यानंतर, तुम्ही WhatsApp वरून UPI पिनच्या मदतीने पेमेंट देखील करू शकतात. ही सुविधा सुरू झाल्याने अनेक प्रवाशांना बिनदिक्कतपणे तिकीट खरेदी करता येणार आहे. अनेकवेळा प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्याचबरोबर टोकन काढताना मशीनमध्ये नोटा स्वीकारतानाही त्रास होत होता. मात्र यामुळे प्रवासी टेन्शनमुक्त प्रवास करू शकणार आहे.