नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होत आहे, मंगळवारी येथील किमान तापमान चक्क १२.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सरासरीच्या तुलनेत औरंगाबादमधील किमान तापमान ३.७ अंशाने कमी नोंदवले गेले. मराठवाडा आणि मध्य भारतात आता किमान तापमानापाठोपाठ कमाल तापमानही कमी व्हायला सुरुवात झाल्याने येत्या दिवसांत या भागांत थंडीचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद खालोखाल नाशिकमधील किमान तापमानात घसरण दिसून आली. नाशिक येथील किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. मंगळवारच्या नोंदीत राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान आता थेट १७ अंशाखाली घसरल्याने सुखद चित्र होते. कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान आता खाली घसरल्याचे सातत्याने नोंदवले जात आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही स्थानकांमध्ये तापमान अद्याप कमी झालेले नाही. मंगळवारच्या नोंदीत कुलाबा येथे २३.५ तर सांताक्रुझ येथे २०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
१५ अंशाखाली किमान तापमान नोंदवले गेलेले जिल्हे – (अंश सेल्सिअस)
- औरंगाबाद – १२.५
- नाशिक -१२.६
- पुणे – १३.३
- महाबळेश्वर – १३.५
- जळगाव – १३.७
- उस्मानाबाद – १३.८
- सातारा, परभणी – १४.४
- लोहगाव, अहमदनगर – १४.८
Join Our WhatsApp Community