मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजना’ फसवणूक प्रकरणात दादर पोलीस ठाण्यात २ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( हेही वाचा : मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी १५ दिवसात सुरू होणार; किती असणार भाडे?)
दादर परिसरात राहणाऱ्या एका व्यवसायिकांच्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर देण्याच्या नावाखाली या व्यापाऱ्याची आणि इतर काही जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दादर पोलिसानी मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्यासह तिघांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.
अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख आल्यामुळे गेल्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांना दादर पोलिसांकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. पेडणेकर यांच्याकडे याबाबत चौकशी करून त्यांना सोडण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते, परंतु त्यादिवशी चौकशीसाठी हजर न राहता किशोरी पेडणेकर मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. दुपारी २ वाजेपर्यत या गुन्ह्यासंदर्भात त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत, पोलिसांना तपासात मी पूर्णपणे सहकार्य करीत आहे. असे पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community