आमदार रईस शेख यांची मागणी महापालिका आयुक्त चहल यांच्या पडणार पथ्यावर!

141

मुंबईतील महापालिकेच्यामाध्यमातून कोविडच्या उपाययोजनांसह खरेदीवर झालेल्या कामांची विशेष चौकशी कॅग मार्फत करण्याचे आदेश सरकारने दिले. परंतु कोविड काळातील कामांच्या खरेदीचे पूर्णपणे अधिकार हे महापालिका आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे असल्याने या चौकशीमध्ये प्रशासकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पदावरून हटवण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. विशेष म्हणजे चहल यांना सध्या महापालिकेतून जायचे असून सरकार त्यांची बदली करत नाही. त्यामुळे रईस शेख हे चहल यांची या निमित्ताने बदली करून त्यांना मदत करत आहेत की चहल यांना खरोखरच बाजुला करण्याची शेख यांची इच्छा आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : पारा पुन्हा घसरला; ‘या’ शहरांत किमान तापमान १२.५ अंशावर)

महापालिकेतील समाजवादी पक्षाचे माजी गटनेते आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी महापालिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत महापालिकेतील १२ हजार कोटींच्या खर्चाप्रकरणी होणाऱ्या विशेष कॅग चौकशी पाहता तात्काळ पदावरून बाजुला करण्याची मागणी केली आहे. रईस शेख यांनी आपल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, करोना केंद्रे उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी, आश्रय योजना, आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई महापालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याचा मुंबई शहराच्या महापालिकेच्या आर्थिक दृष्टिकोनातून राज्य शासनाने अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिक म्हणून तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने आपण या निर्णयाचे स्वागत करतो,असे म्हटले आहे.

मी स्वतः महाराष्ट्र शासन, महापालिका महानगरपालिका सभागृहात तसेच महापालिका आयुक्त यांस लेखी निवेदनाद्वारे विकासकामांमध्ये, कोरोना काळामध्ये होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहाबाबत तसेच निविदा प्रक्रिया, कोरोना काळातील केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, औषधे खरेदी इ. विषयी वारंवार लेखी स्वरूपात निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही म्हटले आहे.

कोरोना काळामध्ये मध्यवर्ती खरेदी खाते (सीपीडी), मुंबई महानगरपालिका विभागामार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत तसेच कोराना केंद्रातील औषधांच्या पुरवठ्याबाबत, साहित्य खरेदी याबाबत होत असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेमार्फत निशल्प रियल्टीज यांच्याकडून दहिसर येथील जमीन व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत तत्कालीन मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असल्याचे म्हटले आहे.

राज्य शासनाने महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यहारातील विशेष चौकशी ‘कॅग’ या स्वायत्त संस्थेमार्फत निर्णय घेतला आहे. या प्रकणाची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी. त्यासाठी यामधील अनेक विकासकामांबाबतचे निर्णय महानगरपालिकेच्या स्थायी समितीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी महानगरपालिका आयुक्त, यांच्याकडे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. याबाबत स्थायी समितीमार्फत ठरावही पारित करण्यात आला होता. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामधील विकास कामांची कँग मार्फत चौकशी सुरू होणार आहे. तेच अधिकारी सद्यस्थितीत त्याच पदावर कार्यरत असणे शासनाच्या नियमावलीनुसार योग्य नाही. कारण या चौकशीमध्ये प्रशासकीय अधिकारी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महानगरपालिका आयुक्तृ तथा प्रशासक यांना या नियुक्तीवरून हटवून योग्य चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही ज्यांनी हा खर्च केला आहे, तेच अधिकारी पदावर असल्याने चौकशीमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या फाईल्स स्वतंत्र कस्टडीमध्ये प्रथमच कॅगने घ्याव्यात अशाप्रकारची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच महत्वाच्या अधिकाऱ्यांकडे या पदाचा भार असेल तर त्यांना या पदापासून दूर करून अन्य पदांचा भार सोपवण्यात यावा,अशीही सूचना केली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून महापालिकेतील कारभारामुळे चहल यांचे मन आता महापालिकेत रमत नसून त्यांचा आता अन्य जागी पोस्टींग मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता रईस शेख यांचे पत्र हे चहल यांना अभिप्रेत अशाप्रकारे बदलीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. या चौकशीच्या माध्यमातून चहल यांचा महापालिकेतून बाहेर पडण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.