चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले असून पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढतांना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव अटोक्यात आणण्यासाठी चीनमधील झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनमधील वाढत्या कोरोनामुळे चीन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या प्लांटमध्ये आयफोनच्या जगातील सर्वात मोठी कंपनी झेंगझोऊमध्ये आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात येताच चीन प्रशासनाने सतर्क होऊन योग्य ती पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे चीनच्या झेंगझोऊमध्ये साधारण ८ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
(हेही वाचा – MSRTC: नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग ‘शिवशाही’चा थरार! बघा व्हिडिओ)
आयफोनचे सर्व उत्पादन बनविणारा मोठा प्लान्ट बंद
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान चीनमधील झेंगझोऊमध्ये कोरोनाबाधितांची आकडा झपाट्याने वाढल्याने गेल्या वर्षीदेखील लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढत असल्याने चीनमधील झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचाच फटका झेंगझोऊमधील आयफोनच्या सर्वांत मोठ्या कंपनीला बसल्याचे समोर आले आहे. झेंगझोऊमध्ये आयफोनचे सर्व उत्पादन बनविणारा मोठा प्लान्ट आहे. या प्रातांतच चीन सरकारने ९ नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या प्रातांत प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वुहानच्या अर्ध्या भागात लॉकडाऊन
चीनने झेंगझोऊ विमानतळ इकॉनॉमी झोनमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या आयफोन उत्पादन कंपनीच्या परिसरात कोरोनामुळे लॉकडाउन लागू केले आहे. कोरोनाच्या भीतीने कामगारांनी कंपनी सोडून तेथून पलायन केले. तैवानची टेक कंपनी फॉक्सकॉन येथे आयफोनचा मोठा प्लांट चालवते. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी फॉक्सकॉनसाठी सात दिवसांचे स्टेटिक मॅनेजमेन्ट (लॉकडाऊन) लागू करण्यात आले. याशिवाय चीनमधील अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून चीनचे मोठे शहर वुहानच्या अर्ध्या भागात लॉकडाऊन सुरू आहे.