कोरोनानंतर राज्यात देशभरात जनावरांना होणा-या आजारांचे प्रमाण वाढत आहे. लम्पी व्हायरसमुळे हजारो दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर आता राजस्थानमध्ये आता एका भयंकर आजाराने शिरकाव केला आहे.
घोड्यांमध्ये आढळून येणा-या ग्लेंडर्स(Glanders Virus) नावाच्या आजाराने राजस्थानमध्ये शिरकाव केला आहे. या आजाराजा प्रादुर्भाव होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. हा आजार बहुतांश घोड्यांमध्ये आढळत असून घोड्यांच्या संपर्कात येणा-या माणसांनाही या आजाराची लागण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये लागण
राजस्थानच्या बगरु भागातील एका घोडीला या ग्लेंडर्स आजाराची लागण झाली. त्यानंतर पशुपालन विभाग बगरुचे नोडल अधिकारी डॉ.राजेंद्र सिंह यांच्या आदेशावरुन स्थापन झालेल्या कमिटीने या घोडीला ठार करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या आजारावर कुठलेही औषध नसल्याने आणि या आजाराचा विषाणू हा संसर्गातून पसरत असल्याने हा आजार होणा-या प्राण्यांना ठार करण्यात येते. तसेच आसपासच्या परिसरातील जनावरांची आणि बाधित घोड्यांच्या मालकांची देखील तपासणी करण्यात येते.
काय आहेत लक्षणं?
ग्लेंडर या विषाणूजन्य आजाराने बाधित घोड्याच्या नाकातून पाणी वाहू लागते, तसेच त्याच्या शरीरावर फोड देखील येतात, अशा घोड्याला श्वसनाचाही त्रास होतो. तसेच जास्त ताप येऊन घोड्याला सुस्ती येते, हीच या आजाराची लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. या आजारावर अजूनही कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने त्याचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान आहे.
Join Our WhatsApp Community