ITR फाईल करणा-या करधारकांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आयटीआर भरताना फॉर्ममधील अनेक किचकट गोष्टी न कळल्यामुळे अनेकदा आयटीआर भरणे अवघड होऊन बसते. त्यामुळेच ITR भरताना एक सुटसुटीत पद्धत आणण्यासाठी प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यामुळे आयटीआर भरणे अधिक सोपे होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सर्व करदात्यांसाठी एकसमान प्राप्तिकर रिटर्न म्हणजेच ITR फॉर्म आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात येणा-या या फॉर्ममध्ये डिजिटल मालमत्तांमधून स्वतंत्रपणे उत्पन्न प्रविष्ट करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे करधारकांना आयटीआर भरणं सोयीचं होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः लम्पीनंतर राजस्थानात घोड्यांमध्ये आढळला ‘हा’ भयंकर आजार, माणसांनाही आहे धोका?)
सामाईक फॉर्म आणण्याचा प्रस्ताव
अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(CBDT)ने ट्रस्ट आणि ना-नफा संस्था वगळता सर्व करदाते या प्रस्तावित नवीन आयटीआर फॉर्मद्वारे त्यांचे रिटर्न सबमिट करू शकतात, असे एका निवेदनात म्हटले आहे. या नव्या फॉर्मबाबत 15 डिसेंबरपर्यंत भागधारकांकडून मते मागवण्यात आली आहेत.
आयटीआर भरणे सोयीचे करण्याचा उद्देश
ITR-7 फॉर्म वगळता सर्व रिटर्न फॉर्म एकत्र करुन एक सामान्य ITR फॉर्म आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या नव्या फॉर्मचा उद्देश वैयक्तिक आणि बिगर व्यावसायिक करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे आणि रिटर्न भरण्याची पद्धत अधिक सोपी करणे हा आहे, असे CBDT कडून सांगण्यात आले आहे. भागधारकांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे तयार केलेला हा सामान्य फॉर्म अधिसूचित करण्यात येईल आणि आयकर विभाग त्याच्या ऑनलाईन वापराबाबत अधिसूचित करेल, असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community