सध्या टी-20 विश्वचषकाचा थरार चांगलाच रंगला आहे. प्रत्येक संघ उंपात्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी झटत आहे. पण विश्वचषकातील अनेक सामने पावसात वाहून गेल्यामुळे काही संघांना विश्वचषकातून बाहेर पडण्याची भीती आहे. समान गुण असलेल्या संघांचे विश्वचषकातील भवितव्य हे त्यांच्या नेट रनरेटवरुन ठरणार आहे.
ग्रुप-1 मध्ये न्यूझीलंड,इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांचे 5 गुण आहेत. तर नेट रनरेट(NRR) जास्त असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. या तिन्ही संघांचा शेवटचा सामना बाकी आहे. त्यामुळे या तिन्ही संघांनी आपले अखेरचे सामने जिंकले तर या तिन्ही संघांचे गुण 7 होणार आहेत.
(हेही वाचाः आता ITR भरणे अधिक सोपे होणार, फॉर्म्समध्ये बदल करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव)
त्यामुळे नेट रनरेटनुसार पहिल्या दोन स्थानांवर असणा-या संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी असून एक संघ बाहेर होणार आहे. त्यामुळे नेट रनरेट वाढवण्यावर या तिन्ही संघांचा भर असणार आहे. पण हा नेट रनरेट नेमका कसा काढला जातो?
असा काढतात नेट रनरेट
नेट रनरेट काढण्यासाठी एक समीकरण ठरवण्यात आले आहे. फलंदाजीच्या रनरेटला गोलंदाजीच्या रनरेटमधून वजा केलं की नेट रनरेट मिळतो. समजा, एका संघाने पहिली फलंदाजी करताना 20 षटकांत 200 धावा केल्या तर त्यांचा बॅटिंग रनरेट 10 असेल आणि याच संघाने गोलंदाजी करताना 20 षटकांत समोरच्या संघाला केवळ 160 धावा करुन दिल्या तर त्यांचा बॉलिंग रनरेट हा 8 होईल. त्यामुळे या संघाचा नेट रनरेट हा 10 वजा 8 म्हणजेच दोन होईल, अशा पद्धतीने नेट रनरेट काढला जातो. एखादा संघ जास्त फरकाने जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला हरवतो तेव्हा त्यांचा नेट रनरेट वाढतो.
जर एखाद्या संघाचा रन रेट हा प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त असेल तर त्या संघाचा नेट रनरेट धनात्मक(Positive)असतो आणि जर त्यांचा रन रेट प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी असेल तर नेट रनरेट ऋणात्मक(Negative) असतो.
Join Our WhatsApp Community