ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उंपात्य फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संघातील विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुधवारी बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीने केला. तर याच सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवनेही आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
यादव पहिल्या स्थानी
सूर्यकुमार यादवने 863 गुणांसह टी-20 आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा 843 गुणांसह दुस-या स्थानी आहे. टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या समान्यात अर्धशतकं ठोकली होती. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यातही त्याने 16 चेंडूत धडाकेबाज 30 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
(हेही वाचाः T-20 World Cup: संघांचं टेन्शन वाढवणारा नेट रनरेट कसा काढतात? वाचा संपूर्ण माहिती)
विराटने मोडला रेकॉर्ड
टी-20 विश्वचषकात 4 पैकी तीन सामन्यांत अर्धशतके करणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूंत नाबाद 64 धावांची खेळी केली आहे. पण याच सामन्यात त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 1 हजार 16 धावा करण्याचा रेकॉर्ड हा जयवर्धनेच्या नावावर होता. पण विराटने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात 16 धावा केल्यानंतर जयवर्धनेचा हा रेकॉर्ड मोडला आहे.
विराटच्या नावावर टी-20 विश्वचषकात 1 हजार 64 धावा करण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तसेच या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील कोहलीच ठरला आहे.
Join Our WhatsApp Community