गेल्या काही दिवसात विविध मॉलच्या किड्स झोनमध्ये मुलांना खेळण्यासाठी नेण्याकडे पालकांचा कल वाढत असल्याचे समोर आले आहे. तुम्ही देखील तुमच्या पाल्यांना मॉलमध्ये खेळ खेळण्यासाठी नेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – मुंबई लोकलमधून आई दोन मुलांना घेऊन पडली अन्…, बघा व्हिडिओ)
काय घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपरमधील टिळकनगर परिसरात राहणारी दलीश करण वर्मा आई-वडिलांसोबत रविवारी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती. तेथे किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळत असताना तिचा तोल गेला आणि ती अचानक खाली पडली. डोक्याला मार बसल्याने दलीश बेशुद्ध पडली. मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळल्याने दलीशला मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, दालीशच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आपल्या मुलांची मॉलमध्ये किंवा कोठेही खेळण्यासाठी नेत असाल किंवा पाठवत असाल तर काळजी घ्या त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community