दिवाळीत एसटीने कमावले २७५ कोटी रुपये

147

दिवाळीच्या काळात हंगामी दरवाढ केल्यानंतरही सर्वसामान्य नागरीकांनी लालपरीवर मोठा विश्वास दाखवला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात दिवाळीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमधून सुमारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. या अकरा दिवसांत एसटीला सुमारे २७५ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असून, संपूर्ण महिनाभरात एसटी महामंडळाने ६४२ कोटी रूपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे.

( हेही वाचा : ‘लाईट अँड साऊंड शो’ मधून उलगडणार वीर सावरकरांचा जीवनपट )

विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एसटीने ५६ लाख किमीचा प्रवास करीत एकाच दिवशी ३१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि दिवाळीचा सण पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बसफेऱ्यांबरोबरच ‘दिवाळी विशेष’ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दरवर्षी प्रवासी दरात १० टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सोडलेल्या जादा गाड्यांद्वारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या माध्यमातून २७५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

ज्येष्ठ नागरीकांनीही घेतला लाभ

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरीक’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील नागरीकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येतो. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील २६ लाख ५५ हजार १३८ नागरीकांनी प्रवास करत सेवेचा लाभ घेतला आहे. तर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ८० लाख ३८ हजार ०९१ ज्येष्ठ नागरीकांनी प्रवास केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.