भीक मागण्यासाठी, विक्रीसाठी मुलांची चोरी करणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रीय

185

मुलांची विक्री करण्यासाठी, भीक मागण्यासाठी लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रिय झालेल्या आहेत. या टोळीने मागील दोन आठवड्यात फुटपाथवर राहणाऱ्या २ कुटुंबातील मुलांची चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून दोन्ही मुलांची सुखरूप सुटका करून अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. या टोळीतील एक टोळी मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणारी आहे तर दुसरी टोळी भीक मागण्यासाठी मुलांची चोरी करते. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अडीच महिने आणि एक वर्षाच्या मुलीची चोरी करण्यात आली होती.

( हेही वाचा : दिवाळीत एसटीने कमावले २७५ कोटी रुपये )

मुंबईतील सेंट झेविअर्स स्कूल येथील फुटपाथवर राहणाऱ्या एका कुटुंबातील अडीच महिन्याच्या मुलीची चोरी गेल्या आठवड्यात झाली होती. मुलीची चोरी झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस ठाणे, डोंगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने २४ तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करून अँटॉप हिल येथून चोरलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून एका दाम्पत्याला अटक केली होती. या मुलीची चोरी करून मुलं नसलेल्या एका दाम्पत्याला विक्री करण्यात येणार होती. अटक करण्यात आलेले दाम्पत्य आणि त्यांच्यासोबत आणखी काही जणांचा समावेश असून त्यापैकी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती . तसेच या पत्रकार परिषदेत सुटका करण्यात आलेल्या चिमुरडीला आई वडिलांच्या ताब्यात दिले होते.

३१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सांताक्रूझ पश्चिमेतील एसएनडीटी महाविद्यालय बसस्टॉपजवळील फुटपाथवर राहणाऱ्या एका कुटुंबातील १ वर्षाच्या मुलीची चोरी करण्यात आली होती, याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांताक्रूझ पोलीस तसेच गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हलवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अपहरणकर्त्यांचा शोध घेतला असता हे अपहरणकर्ते दोन महिला आणि त्यांच्यासोबत एक ८ ते ९ वर्षाची मुलगी असल्याचे समोर आले. सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने या प्रकरणाचा शोध घेतला असता, अपहरणकर्त्या महिला हैद्राबाद येथे चोरलेल्या मुलीला घेऊन गेल्याचे समोर आले. तेथून पुन्हा या महिला मुलीला घेऊन मुंबईच्या दिशेने येत असताना गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने सोलापूर येथील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पोलिसांची मदत घेऊन या महिलांना आणि त्यांनी चोरलेल्या मुलीला ताब्यात घेऊन मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. या महिलांनी या मुलीची भीक मागण्यासाठी चोरी केली होती असे त्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.