ठाकरे गटाचे मुखपत्र सामना या दैनिकात छापून आलेली जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे.
भारतीयस्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचा महासंकल्प या अंतर्गत 75 हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. गुरुवारी अकरा वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा: मुंबई उपनगरात संपूर्ण डिसेंबर महिन्यात स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान: पालकमंत्र्यांची घोषणा )
अरविंद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का?
शिंदे गटावर कायम टीका करणारे अरविंद सावंत यांचेदेखील नाव प्रमुख उपस्थितीमध्ये छापण्यात आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील खासदार आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community