शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधील जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ही जाहिरात दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील शिंदे सरकारवर खोके सरकार म्हणून ठाकरे गटाकडून वारंवार हल्ला करण्यात येतो. इतकेच नाही तर हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका केली. असे असतानाही ही जाहिरात सामनात आल्याने मनसेने ठाकरे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी मनसेकडून एक सवालही उपस्थित केला गेला आहे.
(हेही वाचा – प्रताप सरनाईक पुन्हा ED च्या रडारवर? 11 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार)
मनसेचा खोचक सवाल
सामनातील या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का? असा सवालच मनसेकडून विचारण्यात आला आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केला आहे. सामनाचे खरे रुप जनतेसमोर आले आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे अनधिकृत सरकार आहे. मग या अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? सर्व तत्त्वे बाजूला करतो आणि पैसे गोळा करतो हेच या जाहिरातीतून सिद्ध होत आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
"खोके" सामना मध्ये पोहचले का??? pic.twitter.com/bvZvkZgV2y
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 3, 2022
कशी आहे जाहिरात?
दैनिक सामनाच्या आजच्या अंकात पहिल्या पानावर राज्य सरकारची पूर्ण पान जाहिरात आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचा महासंकल्प या अंतर्गत 75 हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. गुरुवारी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
Join Our WhatsApp Community