हेमंत सोरेन यांचा ईडी चौकशीला हजर राहण्यास नकार, काय आहे कारण?

135

झारखंडमधील बेकायदेशीर उत्खनन आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. परंतु, हेमंत सोरेन यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. आदिवासी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे.

(हेही वाचा – ‘सामना’त शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात! ‘मनसे’ने विचारले, “… खोके पोहोचले का?”,)

मुख्यमंत्री हेमंत सोरेन गुरुवारी रायपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदिवासी नृत्य महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ईडीने सोरेन यांना समन्स बजावल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सत्ताधारी आमदारांची बैठक झाली. यामध्ये हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या सर्व आमदारांनी सरकार अस्थिर करण्यात गुंतलेल्या राज्यपालांसह केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात टप्प्या-टप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण

अवैध खाण उत्खनन प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील एका याचिकेवर राज्यपाला रमेश बैस यांच्याकडे आपले मत नोंदवले होते. मात्र, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, यापूर्वी सोरेन यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती. या छाप्यात हेमंत सोरेन यांचे एक पासबुक आणि चेकबुक जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते पंकज मिश्रा यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती. पंकजा मिश्रा हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील आरोपी असून, त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

चौकशीला नकार, काय आहे कारण?

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा रायपूरचा दौरा पहिलाच ठरला आहे. हा नियोजीत कार्यक्रम असून, तिथे ते आज जाणार आहेत. त्यामुळे त्यांना ईडी चौकशीला हजर राहता येणं शक्य नाही.  ईडीच्या समन्सबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलतील असेही राजेश ठाकूर यावेळी म्हणाले. बेकायदेशीर खाण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनंतर ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावले आहे. ईडीने यापूर्वी पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले होते की, अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बँक खात्याशी जोडलेले चेकबुक सापडले होते. सापडलेल्या कागदपत्रातील दोन चेकवर मुख्यमंत्र्यांची सही आढळली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.