‘जिथे इतिहास बोलत नाही, तिथे भूगोल बोलतो आणि भूगोल जिथे कमी पडतो तेथे…’

168

सह्याद्रीमध्ये फिरताना गडदुर्गांचा अभ्यास करताना इतिहासाच्या पाऊलखुणा शोधल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी इतिहास बोलत नाही तिथे भूगोल बोलतो आणि भूगोल ही जिथे कमी पडतो तेथे विज्ञान साक्ष देते. इतिहास भूगोल विज्ञान या तीन विषयांची सांगड घालून आपण अभ्यास केला पाहिजे, असे वक्तव्य ‘युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांनी केले.

पुढे ते म्हणाले, शेवटपर्यंत माणसाने विद्यार्थी राहायला हवे. आपण गडदुर्गांवरती फिरतो त्यावेळी शरीराने थकलो तरी मनाने कधीही थकू नये, कारण गडदुर्गांचा अभ्यास करणारी व्यक्ती कधी वृद्ध होत नाही. ज्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला त्यांचा इतिहास सांगायला आपण काही घेणे योग्य नाही. त्यामुळे कोणालाही परवडेल एवढीच पुस्तकांची किंमत हवी, अशी आग्रही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

बुधवारी २ नोव्हेंबर २०२२ रोजी दादर येथील मामा काणे हॉटेल हॉलमध्ये श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांच्या ‘युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडाशी संबंधित दुर्ग, आरमार, शस्त्र, अश्व आणि युद्ध या पंचअंगाचा शब्दकोष यावेळी आप्पा परब यांनी थोडक्यात उलगडून सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज केवळ जयजयकारापुरते न वापरता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास परीक्षेतील गुणांसाठी नाही तर जगण्यासाठी करणं आवश्यक असल्याचे त्यांनी उपस्थित रसिक, धारकरी आणि शिवप्रेमींना पटवून सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक पश्चात स्वभाषेच्या रक्षणासाठी आणि वृद्धीसाठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला, त्यांना गुरू मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ उभी करून नवे शब्द मराठी भाषेला दिले आणि आता छत्रपतींनाच गुरू मानणाऱ्या आप्पांनी हा कोष निर्माण केला’, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी आप्पा परब यांच्या या व्रताला शुभेच्छा दिल्या.

1234

या प्रकाशन सोहळ्यास श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार, शिवप्रेमी राम धुरी, निसर्ग अभ्यासक बिभास आमोणकर, शैल भ्रमर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वाळवेकर, मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, राष्ट्रकूट मासिकाचे कार्यकारी संपादक राजन देसाई, दुर्गसृष्टी प्रकाशनाचे प्रकाशक समीर वारेकर, बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक श्रीराम पाध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि आप्पा परब यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.