विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागांमधील जुन्या जीर्ण जलवाहिन्यांची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहेत. या विभागातच महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या गळक्या जलवाहिन्यांचा शोध घेऊन तब्बल एक हजार गळत्या दूर करण्यात दूर करण्यात आल्या आहेत. आता पुढील कामांकरता यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : नागपूर एनआयटीची २५२ घरे तृतीयपंथीयांना; मुख्यमंत्र्यांचे निर्देश )
विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम या महापालिकेच्या के पश्चिम विभागातील जलवाहिन्यांची गळती थांबवणे, दुषित पाण्याचे प्रमाण कमी करणे, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आदींबाबत उपाययोजना करण्यासाठी तसेच गंजलेल्या जुन्या जीर्ण जलवहिनी बदलणे आणि रस्ते विकास कामांमध्ये आड येणाऱ्या जलवाहिन्यांचे जाळे हलवणे, तसेच नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती.
के पश्चिम विभागातील जलवाहिन्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने कोविड काळात अर्थात २४ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी कंत्राटदराची नेमणूक करण्यात आली होती. या कालावधीत विद्यमान जलवाहिन्यांपासून होणाऱ्या तब्बल ९७७ गळत्या दूर करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या जलअभियंता विभागाने केला आहे. विशेष म्हणजे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच पावसाळी जलवाहिन्यांमधून जाणाऱ्या २३६ जलवाहिन्या हलवण्यात आल्या तसेच त्या बदलण्यात आल्याचे जलअभियंता विभागाचे म्हणणे आहे. याशिवाय जुन्या व गंजलेल्या अर्थात १०० मीटरपर्यंत ३५ जलवाहिन्या बदलण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
मात्र,आता या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्यानंतर नव्याने या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या असून या भागांमधील पुढील जलवाहिन्यांच्या कामांसाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी भारत कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे.
Join Our WhatsApp Community