‘कोविड – १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांच्या सोळाव्या फेरीदरम्यान मुंबईतील २३४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ओमायक्रॉनचे उपप्रकार एक्सबीबी (XBB) ने १५ टक्के तर एक्सबीबी.१ (XBB.1) ने १४ टक्के रुग्ण बाधित असल्याचे आढळले आहे. सर्व १०० टक्के नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
( हेही वाचा : केईएम रुग्णालयात दुर्घटना! सिलिंगचा भाग कोसळून महिला जखमी)
पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चाचण्या करण्यात आलेल्या २३४ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १६ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ७ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ६ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. तथापि, या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
रुग्णांचे वयोगटानुसार विश्लेषण-
२३४ रुग्णांची वर्गवारी
० ते २० वर्षे – २४ (१० टक्के)
२१ ते ४० वर्षे – ९४ (४० टक्के)
४१ ते ६० वर्षे – ६९ (२९ टक्के)
६१ ते ८० वर्षे – ३६ (१५ टक्के)
८१ ते १०० वर्षे – ११ (५ टक्के)
सर्वेक्षणातील इतर नोंदी –
एकूण २३४ बाधितांपैकी, ८७ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी, १५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील कोणालाही अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही.
उर्वरित, १४७ जणांनी लस घेतलेली होती. त्यापैकी ७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ओमायक्रॉन बाधित एका रुग्णास अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर २ वयोवृद्ध रुग्णांचा इतर सहव्याधींमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक जण ८८ वर्षांचे पुरुष रुग्ण होते. त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसांचा विकार होता. या सहव्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ७४ वर्ष वयाच्या महिला रुग्णास मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी विकार होते.
आरोग्य विभागाचे आव्हान –
- लसीकरण पूर्ण करून घ्या
- ‘मास्क’चा स्वेच्छेनेने वापर करा
- नियमितपणे साबण लावून हात धुवा