गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपाने आपली फौज रणांगणात उतरवली असून, महाराष्ट्रातील १२ आमदारांवर ३३ मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार हे आमदार गुजरातमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात बारा आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यांच्या 33 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
मुंबईत गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहे. येथील गुजराती समाजाच्या नेत्यांशी असलेली त्यांची जवळीक लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय गुजरातला लागून असलेल्या जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील आमदारांवरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
‘या’ बारा आमदारांची टीम
आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे हे आमदार गुजरातमध्ये प्रचार करतील.
काम काय करतील?
- महाराष्ट्रातून गेलेले नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघांमध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांचा कौल जाणून घेतील.
- भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख यांच्या बैठका, गाव, शहरांतील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेतील.
- त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील शेवटच्या मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल, याचे नियोजन ही नेतेमंडळी करतील.