मंत्रालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला कार्यमुक्तीचे आदेश

138

मंत्रालयात एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी त्यासंबंधीचे आदेश जारी केले. मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात कार्यरत असलेल्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त अवर सचिव यांच्या केबिनमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशी मागणी त्याने केली. त्यावेळी केबीनमध्ये या विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या घटनेबाबत पीडितेने तक्रार दाखल करूनही कारवाई होत नव्हती.

संवेदनशील विषयावर तातडीने लक्ष घालू

त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याला पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे व निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी केली होती. हा प्रकार जेव्हा घडला, त्यावेळी केबिनमध्ये उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कार्यभार २ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. आता अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे. या संवेदनशील विषयावर तातडीने लक्ष घालून कार्यवाही केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गोऱ्हे यांनी आभार मानले आहेत.

(हेही वाचा ‘महाप्रबोधन यात्रे’त स्त्रीचा अवमान, तृप्ती देसाई संतापल्या, वक्त्यांचे ‘प्रबोधन’ करणार!

सखोल चौकशी करा!

या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी. तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये घडणार नाहीत किंवा घडू नयेत म्हणून, प्रत्येक विभागांमध्ये विशाखा समितीची स्थापना करून तिचे कार्य बिनचूकपणे चालावे यासाठी सर्वांनी लक्ष घालावी, अशी सूचना गोऱ्हे यांनी केली. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या या विषयावर आढावा घेणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.