मुंबई महानगरपालिकेने गोखले पूल किमान दोन वर्षांकरता सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूलाचा एक भाग 2018 मध्ये कोसळला असून त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुनर्बांधणीसाठी सोमवार 7 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – मुंबईतील फॅशन स्ट्रीट भागात अग्नितांडव, 8 ते 10 दुकानातील कपडे भस्मसात)
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची पाहणी केली होती. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात रहदारीचा मार्ग आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी योग्य नसून असुरक्षित आहे, असे सांगून तो बंद करण्याची सूचना केली होती. यानंतर पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणते आहे पर्यायी मार्ग
अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी ६ पर्यायी मार्ग दिलेले आहेत.
- खार सबवे, खार
- मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ
- कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले
- अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई
- बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी
- मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव