राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – उदय लळीत

132

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा – BMC निवडणुकीसाठी ‘भाजपा’ने कंबर कसली! ‘मातोश्री’च्या अंगणात ‘जागर…’)

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपली कर्मभूमी सुप्रीम कोर्टात असली तरीही जी कामे हाती घेतली त्यात राज्याशी संबंधित अधिक कामे होती असे सांगितले महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने घरात मराठमोळ वातावरण आणि बांधिलकी कायम ठेवल्याचे ते म्हणाले. राज्यात कोकण सोलापूर नागपूर मुंबई येथे अधिक संबंध आला असला तरी प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी यासाठी मोटरसायकल वरून दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये अनेकदा सहभागी झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध असल्याने मायेची ऊब कायम आपल्या सोबत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध कायम मनात राहील, असे सांगून राज्याच्या वतीने आग्रहाने झालेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

सर्वसामान्यांना न्यायप्रक्रिया सहज समजावी यासाठी न्यायपालिकेच्या कामात मातृभाषेचा उपयोग वाढावा, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. सरन्यायाधीश मराठी भाषेत बोलले याबाबत आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, सर्वसामान्यांचा संबंध असेल त्या क्षेत्रात मातृभाषेतून कामकाज होणे गरजेचे आहे. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमध्ये आपण मराठी भाषेतून बोलण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा केली जात आहे याबाबत समाधान व्यक्त करून सरन्यायाधीश लळीत हे पुढील काही दिवसात निवृत्त होत असले तरीही कायदा क्षेत्राला त्यांचे मार्गदर्शन यापुढेही मिळत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून न्यायालयीन कामकाज अधिक गतीने आणि पारदर्शकपणे व्हावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. राज्य शासन देखील कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असून मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुलभतेने व्हावे यासाठी वांद्रे येथे नवीन न्यायालयीन संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र अनेक बाबतीत देशाचे ग्रोथ इंजिन मानले जाते. अनेक सुधारणांची सुरुवात राज्यातून झाली आहे. राज्याने देशाला अनेक विद्वान, कायदे पंडित दिले. न्यायदानाच्या क्षेत्रातील हा लौकिक लळीत कुटुंबियांनी कायम ठेवला. सरन्यायाधीश उदय लळीत तो वारसा पुढे चालवत असून त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश लळीत यांचा राज्याला अभिमान असून त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हस्ते सत्कार असल्याचे सांगितले. राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विधी व न्याय मंत्री म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरन्यायाधीश लळीत यांच्या न्यायदानातील कार्याचा गौरव करून न्यायदानाचे काम सुलभ व्हावे यासाठी त्यांचे मार्गदर्शन निश्चित मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.