पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून हेतूतः त्यांना लक्ष्य केले जात आहे. महिलांना भारतमातेसमान मानणार्या पू. भिडे गुरुजींनी वडिलकीच्या नात्याने केलेल्या सूचनेचा भावार्थ समजून न घेता त्यांना महिलाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे विधवा महिलांना कुंकू लावण्याची मोहीम घेतली की ते पुरोगामित्व ! तेच पुरोगामित्व एक विवाहित स्त्रीला कुंकू लावण्यास सांगितल्यावर धोक्यात कसे काय येते? विधवा महिलेला कुंकू लावणे योग्य असेल, तर विवाहित महिलेला ‘कुंकू लाव’ असे म्हणणे, हा गुन्हा कसा होऊ शकतो? हा विषय महिला आयोगाच्या कक्षेत येतो का? त्यामुळे स्वतःच्या पदाचा राजकीय हेतूने उपयोग करून स्वपक्षातील प्रकरणांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणार्या रूपाली चाकणकर यांना तात्काळ या पदावरून हटवून निःष्पक्ष व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
काय म्हटले समितीच्या पत्रकात?
- नवी मुंबईत नुकतेच चर्चप्रणीत अनाथालयात अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले, यावर महिला आयोगाने कठोर भूमिका का घेतली नाही? राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर महिलांनी आरोप केल्यावर त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न का झाला नाही?
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाषणात ‘मम भार्या समर्पयामी…’ म्हणत समस्त महिलांचा जाहीर अपमान केला, त्यांना आयोगाने नोटीस का बजावली नाही?
(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)
- दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘दोबारा’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या वेळी अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या संदर्भात ‘तिच्यापेक्षा माझी छाती मोठी आहे’, असे अतिशय अश्लाघ्य विधान केले होते, त्यांनाही नोटीस पाठवण्याचे धाडस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना झाले नाही; मात्र हिंदु संस्कृतीचे स्मरण करून देणारे विधान हे त्यांना जास्त घातक वाटते. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो. हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेवर असतांना अशा हिंदुद्वेषी नेत्यांना महत्त्वाच्या पदावर अद्यापपर्यंत का ठेवण्यात आले आहे ? असा आमचा प्रश्न आहे.
- मुळात यापूर्वी पू. भिडेगुरुजींना भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे येनकेन प्रकारेन पू. भिडे गुरुजींना त्रास देण्याचा हा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी पू. भिडे गुरुजींना पाठवलेली नोटीस हा त्यातलाच प्रकार आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते.
- ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचा प्रसार केला, हिंदु संस्कृतीनुसार आचरण केले, महिलांचा सन्मान करण्याची शिकवण युवकांना दिली, अशा ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर शिंतोडे उडवणार्या रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.