दादरकडील पदपथ कुणाचे? व्यवसायाच्या ठिकाणीच फेरीवाल्यांच्या सामानांचा बोजा बिस्तारा

145

मुंबईतील पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असले, तरी हे पदपथच आता फेरीवाल्यांनी अतिक्रमित केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास पदपथ नाही. परंतु पदपथ हे पादचाऱ्यांसाठी नसून ते महापालिकेचेही नसल्याचा दावा करत काही फेरीवाल्यांनी तर या पदपथांवरच मालकी हक्काचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दादर पश्चिमेतील अनेक पदपथांवर व्यावसायाशिवाय फेरीवाल्यांचे साहित्य हे त्याच जागी पदपथावर बांधून ठेवले जात आहे. ज्यादिवशी व्यावसाय केला जात नाही, त्यादिवशी हे साहित्य प्लास्टिकने बांधून ठेवत आपल्या जागेवर अन्य कुणी व्यवसाय करणार नाही याची काळजी फेरीवाले घेताना दिसत आहेत.

व्यवसायाचे साहित्य त्याच ठिकाणी बांधून ठेवले जाते

मुंबईतील रस्ते आणि पदपथ हे महापालिकेच्या मालकीचे असून महापालिकेच्या माध्यमातून वाहतुकीसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ विकसित करून दिले जातात. परंतु दादर पश्चिम येथील जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि रानडे मार्गासह केळकर मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. परंतु अनेक मार्गावर रात्रीच्या वेळी फेरीवाले उठल्यानंतरही त्यांचे व्यवसायाचे साहित्य त्याच ठिकाणी बांधून ठेवले जाते. त्याचठिकाणी आपले सामान बांधून ठेवले जात असल्याने नक्की हे पदपथ कुणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा BMC निवडणुकीसाठी ‘भाजपा’ने कंबर कसली! ‘मातोश्री’च्या अंगणात ‘जागर…’)

फेरीवाल्यांनी जागा अडवून ठेवल्या

जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग तसेच केळकर मार्ग आदी ठिकाणी बहुतांशी फेरीवाले हे सामान बांधून ठेवत आहे. महापालिकेच्या नियमानुसार फेरीवाल्यांना व्यावसायाची अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे फेरीवाले व्यावसाय करत आहेत, त्यांनी रात्री तिथे सामान बांधून ठेवणे अपेक्षित नाही. त्यांना व्यवसायाच्या जागेवर सामान बांधून ठेवता येऊ शकत नाही. परंतु आजही डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग आणि केळकर मार्गावर बऱ्याच ठिकाणी फेरीवाल्यांनी जागा अडवून ठेवल्या आहेत. त्यांनी आपले साहित्य तिथेच बांधून ठेवलेली आहेत. या फेरीवाले जणू काही या जागा विकत घेतल्याप्रमाणे त्या जागेवर कब्जा दाखवून आपल्या व्यावसायाचे साहित्य त्याच ठिकाणी बांधून ठेवत आहेत.

फेरीवाल्यांमुळेच दादरमधील पदपथांची सुधारणा होत नाही

पदपथ या महापालिकेच्या आहेत असे आम्ही सांगत असलो तरी प्रत्यक्षात या पदपथांच्या जागा परस्पर विकल्या गेल्या असून ज्यांनी या जागा विकत घेतल्या त्यांच्याकडूनही पदपथांवर व्यावसायाचे साहित्य बांधून ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. काही नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, येथील पदपथांची डागडुजी तथा विकास करण्याचा महापालिकेचा मानस असला तरी फेरीवाल्यांमुळेच दादरमधील पदपथांची सुधारणा होत नाही. फेरीवाल्यांकडून पदपथांच्या सुधारणेच्या कामांना विरोध केला जात असून लोकप्रतिनिधींकडूनही सहकार्य मिळत नाही. विशेष म्हणजे फेरीवाल्यांचा व्यवसाय बुडतो म्हणून पदपथांची सुधारणा करण्यासाठी सहकार्य केले जात नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पदपथावर फेरीवाल्यांना आपले सामान बांधून ठेवण्याची परवानगी नसून अशाप्रकारे जर पदपथ कायमस्वरुपी मालकी हक्काप्रमाणे फेरीवाले अडवून ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. परंतु जोवर तक्रार येत नाही तोवर त्यावर कारवाई केली जात नाही, असे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.