गेल्या काही काळापासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरालाही अजित पवार यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे अजित पवारांची नाराजी ही पुन्हा एकदा उघड झाली. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता राणे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीसांना विचारुन सांगतो
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथा झालेल्या पक्ष शिबीराला अजित पवार अनुपस्थित राहिले आणि त्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात पक्षाबाबत नक्कीच नाराजी असल्याचे पुन्हा एकदा बोलले जाऊ लागले. याबाबत विचारले असता नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची नाराजी मला कशी माहीत असणार? त्यांची नाराजी त्यांच्या जवळच्या लोकांना जास्त कळत असेल. देवेंद्र फडणवीस यांना त्यांची नाराजी जास्त माहीत असेल त्यामुळे त्यांना विचारुन मी सांगतो, अशी मिश्कील टिप्पणी नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
खैरे रिटायर्ड झाले आहेत
यावेळी नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचाही खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये येतील,असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते. त्याबाबत राणे यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या लोकांबाबत मला विचारू नका. ते आता रिटायर्ड झाले आहेत. ही सगळी संपलेली माणसं आहेत, राजकारणात त्यांच्या शब्दाला कसलीही किंमत नाही, अशी टीका राणे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community