माझी बॅट म्हणून मीच बॅटिंग करणार असं लहान मुलं सहज म्हणून जातात. आपणही लहान असताना अशा गोष्टी केल्या असतील. माझ्या घरात खेळताय तर माझे रुल्स असतील या सर्व गोष्टी लहानपणीच्या. मोठे झाल्यानंतर आपण सुजाण होतो, आपल्याला कळू लागतं, मग अशा गोष्टी आपण करत नाहीत. लहानपणीच्या त्या गोष्टी आठवल्या की, आपल्याला आपलंच हसू येतं. पण आता जर असं कुणी वागू लागलं तर आपण त्याला काय म्हणू?
सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम चर्चेत आहे. बाळासाहेबांचा द्वेष करणार्या कुमार केतकर आणि निखिल वागळे यांना स्मारकाचे सदस्य बनवून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववाद्यांना चांगलंच बनवलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी एक विचित्र पवित्रा घेतलेला आहे. “शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
पण खरं पाहता तोतयागिरी कोणी केली याचा विचार ठाकरेंनी करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी सत्तेसाठी पुष्कळ तडजोड केली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या नावापुढील हिंदुह्रदयसम्राट ही जनतेने बहाल केलेली पदवी हटवली. बाळासाहेबांच्या शत्रूंसोबत संसार थाटला. इतकंच काय तर त्यांनी हिंदुंना त्रास देणार्यांना सहकार्य केलं. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर दूर जात राहिले. आता तर जे जे हिंदू विरोधी ते ते आपले, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उलट एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं तत्व वाचवलं.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी संस्कृतीशी जुळवून ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना खोटं ठरवलं. शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना हा गट स्थापन करुन त्यांनी बाळसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे म्हणतात की शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा फोटो असेल. मग ते नारायण राणे यांचा फोटो लावू शकतात का? की मनोहर जोशींचा नाइलाजाने लावून स्वतःचा फोटो लावतील. कारण शिंदेंना वगळता शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री आहेत. मनोहर जोशी, नारायण राणे आणि स्वतः उद्धव ठाकरे.
मग शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील या वाक्याचा काय अर्थ आहे. ४ मुख्यमंत्री झाले शिवसेनेच्या राजकीय कार्यकाळात. त्यात उद्धव ठाकरे बळजबरी येऊन बसले. शिवसेनेच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने ५ वर्षे राज्य केलं नाही. आता उद्धव ठाकरे म्हणतात, “माझी ऊर्जा कधी कमी होत नाही, माझ्यात बाळासाहेब आहेत, त्यामुळे माझ्यातली ऊर्जा कधी कमी होतच नाही” त्यांच्यात बाळासाहेब आहेत असं त्यांना वाटतं. पण ते अगदी बाळासाहेबांच्या विपरित वागतात. मग त्यांच्यात जे आहे ते काय आहे? त्यांच्यात कुणीतरी वेगळी व्यक्ती आहे का? याचा विचार त्यांनीच करायला हवा.
मी तर असं म्हणेन की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली आहे. कारण ते बाळासाहेबांपासून दूर जात होते, शिवसैनिकांना देखील ते दूर घेऊन जात होते. पण एकनाथ शिंदे यांनी उठाव करुन सर्व शिवसैनिकांना पुन्हा बाळासाहेबांच्या जवळ आणलं, त्यांच्या विचारांच्या जवळ आणलं आणि बाळासाहेबांनी सुरु केलेली शिवसेना वाचवली. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो लावायला हवा. जेणेकरुन बाळासाहेबांच्या स्मारकाला अर्थ प्राप्त होईल. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय बाळासाहेबांच्या स्मारकाला अर्थ प्राप्त होणार नाही आणि त्यांच्या जीवन-चरित्राला देखील.
Join Our WhatsApp Community