वाढत्या स्तन कर्करोगामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत स्तन कर्करोगात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, तिस-या टप्प्यात कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. परिणामी, स्तन कर्करोगाची बाधा आता अनुवांशिक होत असल्याचाही धोका व्यक्त केला जात आहे. स्तन कर्करोग झालेल्या महिलांच्या मुलांनी स्तन कर्करोगाची चाचणी नियमितपणे करायला हवी, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञ प्रकर्षाने करु लागले आहेत.
लहान वयातही आढळते स्तन कर्करोगाचे प्रमाण
कमी वयात स्तन कर्करोगाचे निदान होणे, सध्या सहज झाले असल्याची माहिती कर्करोगतज्ज्ञ देतात. वयाच्या विशीपासून सध्या स्तन कर्करोगाची बाधा झाल्याच्या महिला आम्हाला आढळून येत आहेत. वयाची तिशी ओलांडण्याअगोदरच कित्येकदा महिलांना रेडिएशनमुळे केस गमवावे लागतात. शारीरिक आघातासह महिलांना कमी वयातच या मोठ्या मानसिक आघाताला सामोरे जावे लागते.
(हेही वाचाः देशात पहिल्यांदाच होतेय वाघांचे स्थलांतर? अखेरच्या टप्प्यात होतोय हा मोठा बदल)
मॅमोग्राफी चाचणी बंधनकारक
स्तन कर्करोगाबाबत बाजारात मॅमोग्राफी चाचणी उपलब्ध आहे. परंतु या चाचणीबाबत महिलांच्या मनात प्रचंड प्रमाणात भीती असल्याचे निरीक्षण कर्करोगतज्ज्ञांनी नोंदवले आहेत. तुमच्या सख्ख्या बहिणीला लहान वयातही स्तन कर्करोग झाला असेल, तर दर वर्षाला मॅमोग्राफी चाचणी करणे बंधनकारक आहे, असेही कर्करोगतज्ज्ञ सांगतात.
मॅमोग्राफी चाचणी कधी करावी?
- सख्ख्या भावंडांपैकी एखाद्याला स्तन कर्करोग झाला असल्यास दरवर्षाला मॅमोग्राफी चाचणी करा
- स्तन कर्करोगाचे निदान झालेल्या महिला रुग्णाच्या मुलीचे वय पस्तीशीपार असेल, तर मुलांनी दर वर्षाला स्तन कर्करोग चाचणी करायला सुरुवात करावी.